गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात विविध खनिज संपत्ती, वनसंपत्ती आहे. या वनसंपत्तीवर आधारित उद्योग प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. याकरिता भाजपच्या वतीने ‘मेक इन गडचिरोली’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘मेक इन गडचिरोली’ या संकल्पनेतून जिल्ह्याचा विकास होणार असा विश्वास खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे यांनी सोमवारी सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.यावेळी माहिती देताना खा. अशोक नेते म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात मोहटोळी, बांबू, तेंदूपत्ता, तुळशी, कडुली, कोसा, मशरूम, चारोळी, हिरडा, बेहडा, मोहफूल आदी वनोपजाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ हा नारा देऊन देशात औद्योगिक विकासाची संकल्पना अंमलात आणली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेक इन महाराष्ट्र’ ही संकल्पना अंमलात आणून राज्याच्या विकासाचे नियोजन सुरू केले आहे. याच धर्तीवर भाजपा जिल्हा गडचिरोली व भाजपाचे आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी ‘मेक इन गडचिरोली’ ही संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील वनोपज, खनिज संपत्ती व कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणारे छोटे-मोठे उद्योग क्लस्टरच्या माध्यमातून उभारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी महिला व पोलीस बचतगटांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळाला ‘सर्किट टुरिझम ठिकाण’ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशीही माहिती खा. अशोक नेते यांनी यावेळी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)रेल्वे मार्गासाठी केंद्राकडून ८० कोटी मिळाले४गडचिरोली जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित देसाईगंज-गडचिरोली या मंजूर रेल्वे मार्गासाठी आपल्या प्रयत्नाने केंद्र सरकारकडून ८० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. राज्य सरकारकडून ५० टक्के वाट्याच्या निधीची तरतूद होणार असून सदर निधी लवकरच मिळणार आहे. केंद्राकडून निधी उपलब्ध झाल्यामुळे देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे, अशीही माहिती खा. अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली.वर्धापन दिनी चर्चासत्र व मार्गदर्शन४‘मेक इन गडचिरोली’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी कोणकोणत्या बाबी करणे आवश्यक आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. यावर विचारमंथन होण्यासाठी जिल्हा वर्धपन दिनी २६ आॅगस्ट रोजी चर्चासत्र व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात जिल्ह्याच्या विकासासासंदर्भात जिल्हा व जिल्ह्याबाहेरील अनेक विशेष तज्ज्ञ मान्यवर विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. यातून ‘मेक इन गडचिरोली’ची संकल्पना अधिक व्यापक होणार असल्याचे खा. अशोक नेते यावेळी म्हणाले.
‘मेक इन गडचिरोली’ संकल्पनेतून जिल्हा विकास शक्य
By admin | Updated: August 25, 2015 01:28 IST