गाेंडवाना विद्यापीठांतर्गत गडचिराेली जिल्ह्यात बाराही तालुके मिळून एकूण ६६ वरिष्ठ महाविद्यालये आहेत. शासनाच्या निर्णयानुसार १५ फेब्रुवारी २०२१ पासून सर्वच महाविद्यालये सुरू करून प्रत्यक्ष वर्ग भरविण्यात आले. पहिल्या दिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांना उपस्थिती दर्शविण्यासाठी सूचित करण्यात आले हाेते. त्यानुसार विद्यार्थी महाविद्यालयात दाखल झाले. मात्र २० टक्केच्या आसपास विद्यार्थी उपस्थिती हाेती.
काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून पहिल्या वर्गापासून ते पदवी ते पदव्युत्तरपर्यंतच्या सर्व वर्गाचे तास बंद करण्यात आले. दरम्यान अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत खंड पडला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, यासाठी ऑनलाइन शिक्षणपद्धती अंमलात आणण्यात आली. गडचिराेली जिल्ह्यात नाेव्हेंबर महिन्यापासून बराच कमी झाला. दरम्यान पहिल्या टप्प्यात राज्य शासनाच्या निर्णयानुसार नाेव्हेंबरअखेरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात भरविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग प्रत्यक्ष भरविणे सुरू झाले. हे सर्व वर्ग सुरू झाल्यानंतर सुद्धा काेराेनाचा संसर्ग वाढला नाही. परिणामी महाविद्यालयातील वर्ग प्रत्यक्षात भरविण्याची मागणी पालक, विद्यार्थी व महाविद्यालयांकडून हाेत हाेती. अखेर शासनाच्या परवानगीने १५ जानेवारीपासून वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व वर्ग प्रत्यक्ष भरविण्यास सुरुवात झाली आहे.
काेट ......
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या दि. ३ फेब्रुवारी २०२१च्या शासन निर्णयानुसार, विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाविद्यालयांमध्ये काेविड प्रतिबंधात्मक उपाययाेजना करून जागेची उपलब्धता पाहून ५० टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांना राेटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश देण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार आज महाविद्यालयांत ५० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मुुभा हाेती. पहिल्या दिवशी विद्यार्थी उपस्थिती कमी असली तरी मार्चअखेर विद्यार्थी उपस्थिती वाढणार आहे.
- डाॅ. अनिल चिताडे, प्रभारी कुलसचिव, गाेंडवाना विद्यापीठ, गडचिराेली
बाॅक्स ...
महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सूचना फलक
गडचिराेली शहरास जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांनी वरिष्ठ महाविद्यालय सुरू करून वर्ग भरविण्याच्या पहिल्या दिवशी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांसाठी सूचना फलक लावले हाेते. त्यानुसार महाविद्यालयांत प्रवेश करताना पालकांचे संमतिपत्र सादर करणे अनिवार्य आहे, मास्कचा नियमित वापर करावा, सुरक्षित शारीरिक अंतर ठेवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, वर्गखाेलीमध्ये सुरक्षित अंतरावर बसावे आदी सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आल्या हाेत्या.
काेट ........
गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू हाेते. मात्र आमच्या तालुक्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी बऱ्याचदा राहत नाही. कव्हरेज व इंटरनेट स्पीड राहत नसल्याने ऑनलाइन शिक्षण फारसे प्रभावी ठरू शकले नाही. मात्र आता साेमवारपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले असून, आम्ही विद्यार्थी मास्क घालून व काेविडचे नियम पाळत पहिल्या दिवशी तासिकांना हजेरी लावली.
- प्रणव डाेंगरे, विद्यार्थी
काेट ........
आमच्या महाविद्यालयात पहिल्या दिवशी बाेलाविण्यात आलेल्या ५० टक्के विद्यार्थ्यांची थर्मलगनच्या सहाय्याने तापमान तपासणी करण्यात आली. सॅनिटायझरचा वापर करून तसेच मास्क घालून येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश देण्यात आला. एका बाकावर एक विद्यार्थी बसवून तासिका घेण्यात आल्या.
- डाॅ. डी. जी. म्हशाखेत्री, प्राचार्य, कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय, चामाेर्शी