गडचिरोली : गेल्या दोन निवडणुकांपासून आरमोरी विधानसभा मतदार संघ काँग्रेसने आपल्या ताब्यात राखला आहे. तर २००९ च्या निवडणुकीत भाजपचा गड असलेला गडचिरोली विधानसभा मतदार संघ काँग्रेसने ९६० मतांनी भाजपकडून खेचून आणला आहे. हे दोनही विधानसभा मतदार संघ आगामी निवडणुकीतही आपल्याकडे राखून ठेवण्याचा मोठे आव्हान काँग्रेस पक्षासमोर आहे. मात्र या निवडणुकीत सुरूवातीपासूनच काँग्रेसमध्ये नाराजीचे सत्र, रूसवा-फुगवा राजकारण जोर पकडून आहे. त्यामुळे काँग्रेस हे आव्हान कितपत पेलून धरते, याविषयी मतदारांसह काँग्रेस नेत्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.नवरात्र प्रारंभ होताच काँग्रेस पक्षाची यादी जाहीर झाली. पहिल्याच यादीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसची उमेदवारी सगुणा पेंटारामा तलांडी तर आरमोरीची उमेदवारी विद्यमान काँग्रेस आमदार आनंदराव गेडाम यांना जाहीर झाली व त्याचबरोबर गटबाजीचे राजकारण सुरू झाले. आजवर आरमोरी विधानसभा क्षेत्र व काँग्रेस यांचे समिकरण म्हणजे पोरेड्डीवार गट असे जुळलेले होते. ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या पुढाकाराने आनंदराव गेडाम हे निवडणुकीच्या रिंगणात मागील १० वर्षांपासून मैदान मारत आले आहे. यावेळी पहिल्यांदा आनंदराव गेडाम एकट्याने काँग्रेसचा किल्ला लढत आहे. त्यांच्यासोबत त्यांनी मागील १० वर्षात निर्माण केलेले कार्यकर्ते आहेत. यांच्या भरवशावर त्यांची निवडणुकीची मदार आहे. दुसरीकडे पेसा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे व ओबीसींच्या कमी झालेल्या आरक्षणामुळे आरमोरी तालुक्यातील गैरआदिवासी मतदार काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही कंटाळलेला आहे. या साऱ्यांनी मिळून आजवर आपल्यावर अन्यायच केला. याचा पाढा वाचल्या जात आहे. त्यामुळे या साऱ्या राजकीय पक्षांना पर्याय शोधण्याचे काम तो करू लागला आहे. मागील १० वर्षापासून काँग्रेसचे आमदार या मतदार संघात आहे. त्यामुळे येथील जागा टिकविण्याचे पक्षासमोर मोठे आव्हान आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्राची जागा गेल्या निवडणुकीत भाजपकडून काँग्रेसने आपल्या पदरात पाडून घेतली व गेल्या ५ वर्षात काँग्रेसने सरकारच्या माध्यमातून जोरदार कामही केले. मात्र निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने आपला उमेदवार बदलविला. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे कारण देत काँग्रेसने ही कृती केली. मात्र येथे नवा उमेदवार देतांना येथील सर्व गटांना विश्वासात घेतले नाही, असे आता दिसून येत आहे. एकाला पकडले तर दुसरा रूसतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर सलग तीन दिवसात तीन जिल्हाध्यक्ष बदलविण्याचे धाडस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले. याचेही परिणाम या निवडणुकीवर पडत आहे.अध्यक्षपदावरून उचलबांगडी करताच प्रकाश अर्जुनवार यांनी पक्षत्याग करून टाकला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजर असलेले माजी खासदार मारोतराव कोवासे प्रकृतीच्या कारणामुळे प्रचारापासून दूर आहे. तर काँग्रेसचा जि. प. तील गटनेता शिवबंधन बांधून मैदानात उभा आहे. काँग्रेसच्या एक महिला दुसऱ्या राजकीय पक्षाकडून रिंगणात आहे. या साऱ्या अडचणीचा सामना करत नवे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात आता सगुणा तलांडींना मैदानात लढाई लढायची आहे. उसेंडी त्यांच्या प्रचारासाठी भिडले हा त्यांच्यासाठी दिलासा असला तरी समोर तगडे आव्हान आहे. या परिस्थितीत काँगे्रसला आपले प्राबल्य कायम राखणे मोठे आव्हान राहणार आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने १९८० व १९९० मध्ये विजय मिळविला होता. १९८० मध्ये पेंटारामा तलांडी प्रतिस्पर्धाचा उमेदवारी अर्ज रद्द झाला म्हणून अविरोध निवडून आले होते. तर १९९० मध्ये धर्मरावबाबा आत्राम यांच्या रूपाने काँग्रेसला ही जागा मिळाली होती. त्यानंतर कधीही काँग्रेस येथे यश मिळवू शकली नाही. मागील १५ वर्षापासून या भागातून विधानसभा निवडणुकीत पंजा आघाडीच्या राजकारणामुळे गायबच होता. यंदा पुन्हा काँग्रेस मुक्तेश्वर गावडेच्या रूपाने मैदानात आहे. काँग्रेसची या भागात १५ ते २० हजाराची व्होटबँक आहे. त्यामुळे काँग्रेस येथे इतर राजकीय पक्षांना निश्चितपणे धक्का देऊ शकते, एवढ्या ताकतीत आहे. सिरोंचा पंचायत समितीवर मागील १५ वर्षापासून काँग्रेसचे प्राबल्य आहे. भामरागड तालुका बहादुरशहा आलाम यांच्या मृत्यूपर्यंत काँग्रेसचा गड होता. कधीही या भागात भाजपचा शिरकावही झाला नव्हता. परंतु स्थानिक पातळीवर काँग्रेस नेतृत्व हरविल्याने भामरागड तालुक्यात कमळ बहरले. त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातही काँग्रेससाठी संधी मोठी आहे.
काँग्रेससमोर जागा राखण्याचे आव्हान
By admin | Updated: October 4, 2014 23:27 IST