मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१९ हे वर्ष जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून काढणारे होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसोबतच जिल्ह्यात अनेक वर्षानंतर अस्तित्वात आलेल्या आरमोरी या नवीन नगर परिषदेची निवडणूक याच वर्षात झाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपच्या बाजुने लागले असले तरी २०१४ च्या तुलनेत भाजपचे मताधिक्य घटले आणि दक्षिणेकडील तालुक्यात १० वर्षानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आले. या वर्षात शिवसेनेची बऱ्यापैकी वाताहात झाली, तर काँग्रेससाठीही हे वर्ष फारसे चांगले राहिले नाही.लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिल रोजी तर विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान झाले. नक्षली आव्हानांना न जुमानता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीवरील विश्वास सिद्ध केला. त्यासाठी जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि विशेषत: पोलीस यंत्रणेने घेतलेली मेहनत कामी आली. मतदानात अडथळे आणण्याचा नक्षलवाद्यांनी प्रयत्नही केला. पण पोलिसांनी त्यावर मात करत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली.या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या बाजुने मतदारांनी कौल दिला. खासदार अशोक नेते यांच्या गळ्यात सलग दुसऱ्यांदा खासदारकीची माळ पडली. मात्र यावेळी त्यांना २०१४ एवढे मताधिक्य टिकवणे शक्य झाले नाही. २०१४ मध्ये खा.नेते यांचे मताधिक्य २ लाख ३६ हजार होते. २०१९ मध्ये मात्र हे मताधिक्य ७७ हजारांवर आले. असे असले तरी प्रतिकुल परिस्थितीत त्यांचा हा विजय पक्षाला बळकटी देणारा ठरला.आॅक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजप उमेदवारांचे मताधिक्य घटले. गडचिरोलीतून डॉ.देवराव होळी आणि आरमोरी मतदार संघातून कृष्णा गजबे यांनी विजय मिळवला असला तरी २०१४ सारखे दणदणित यश त्यांना मिळू शकले नाही.या निवडणुकीत अहेरी मतदार संघ भाजपने गमवला. भाजपच्या हातून हा मतदार संघ निसटण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत हे भाजपने एव्हाना शोधूनही काढले असणार. त्यामुळे ती खऱ्या अर्थाने पक्षाची हार होती की उमेदवाराची, हा चर्चेचा विषय झाला.वास्तविक लोकसभा निवडणुकीपासूनच भाजपची अहेरी मतदार संघावरील पकड सैल झाली होती. भाजपच्या तिकीटवर २०१४ मध्ये निवडून गेल्यानंतर अहेरी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे अम्ब्रिशराव आत्राम यांना राज्यमंत्रीपद बहाल करण्यात आले. परंतू मतदार संघावरील पक्षाची पकड अधिक मजबूत करणे त्यांना जमले नाही. परिणामी काका-पुतण्याचा सामना पुन्हा एकदा रंगून धर्मरावबाबा आत्राम यांनी २००९ च्या निवडणुकीपासून गमावलेला अहेरीचा गड पुन्हा काबिज केला.यामुळे दक्षिण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार झाले. त्यातच राज्य मंत्रिमंडळात धर्मरावबाबांना स्थान मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आणखी वाढण्याची शक्यता आहे.अम्ब्रिशराव सक्रिय होणार?विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभवाच्या धक्क्यातून अम्ब्रिशराव आत्राम अजून सावरलेले नाही. निवडणूक निकालानंतर ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा पक्षाच्या बैठकांमध्ये दिसले नाही. त्यामुळे ते सध्यातरी राजकीय घडामोडींपासून अलिप्त आहेत. अहेरीत राहण्याऐवजी मुंबई, नागपूरमध्ये त्यांचे जास्त वास्तव्य आहे. नवीन वर्षात ते पुन्हा सक्रिय होतील आणि अहेरीच्या ‘रुक्मिणी महल’वरील वर्दळ वाढेल, अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.‘आविसं’चे अस्तित्व पणालादक्षिणेकडील तालुक्यांमध्ये सक्रिय असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा माजी आमदार दीपक आत्राम यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन निवडणूक लढली. मतविभाजनामुळे त्यांना निवडणूक जिंकणे शक्य झाले नसले तरी ते पुढील काळात काँग्रेसमध्ये सक्रिय राहतील का? असा प्रश्न कायम आहे. दक्षिण भागात आदिवासी विद्यार्थी संघाचे काही स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व आहे. त्या रूपाने आविसंचे अस्तित्व कायम आहे, मात्र दीपक आत्राम काँग्रेसवासी झाल्याने आविसंचे अस्तित्व पणाला लागले आहे.
भाजपचे वर्चस्व कायम, दक्षिणेकडे राष्ट्रवादीचा वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST