अशोक नेते यांचे प्रतिपादन : मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रमधानोरा : आजचे बालक हे उद्याचे भविष्य आहे, त्यामुळे सुदृढ बालक निर्माण झाल्यास बलशाली भारत तयार होईल, त्यासाठी महिला व बालकाच्या आरोग्याची काळजी आरोग्य कर्मचाऱ्यांसह सर्वांनीच घेतली पाहिजे. प्रत्येक व्यक्ती हा सुखी आणि संपन्न होण्यासाठी त्याचे आरोग्य चांगले राहीले पाहिजे, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय नागपूर, चंद्रपूर, वर्धा यांच्या विद्यमाने बुधवारी धानोराच्या किसान भवनात मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, धानोराच्या नगराध्यक्ष वर्षा चिमुरकर, महिला व बालकल्याण सभापती मंगला मडावी, भाजपचे प्रदेश सदस्य प्रमोद पिपरे, संवर्ग विकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय साबणे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी एन. ए. कोहळे, डॉ. शारदा पाटील, नागपूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. होळी यांनी इंद्रधनुष्य मिशनच्या माध्यमातून बालकांना लसिकरण केले जाणार असून या लसीमुळे बालक रोगमुक्त होणार आहे. त्यामुळे या योजनेतून लसिकरण करून घेण्यासाठी माता-पित्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. होळी यांनी केले. सकाळी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीचे उद्घाटन नगराध्यक्ष वर्षा चिमुरकर यांच्या हस्ते झाले. या रॅलीत ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धाही या निमित्ताने घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विजेत्या पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
सुदृढ बालक निर्माण करण्यासाठी काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2016 02:00 IST