देचलीपेठातील स्थिती : ८० किमी अंतरावरील शिक्षकाकडे मुख्याध्यापकाची जबाबदारी अहेरी : दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून आश्रमशाळा उघडण्यात आल्या. या शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत; मात्र अनेक शाळांमध्ये शिक्षक व सोयीसुविधांचा अभाव आहे. तालुक्यातील देचलीपेठा येथील आश्रमशाळेत रोजंदारी शिक्षकांच्या भरवशावरच शाळेचा कारभार चालविला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. देलचलीपेठा येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून १९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तीन वर्षांपासून शाळेत स्थायी मुख्याध्यापक नाही. तसेच मागील दहा वर्षापासून आश्रमशाळेत महिला अधीक्षिका नाही. एका शिक्षिकेकडे अधीक्षिकेची जबाबदारी देण्यात आली आहे. तिलाच प्राथमिक शिक्षिकेचीही जबाबदारी ही पार पाडावी लागत आहे. शाळेत १२ शिक्षकांची आवश्यकता असतानाही २ माध्यमिक आणि २ प्राथमिक असे एकूण ४ शिक्षक शाळेत कार्यरत आहेत. तर तासिक तत्त्वावर ८ शिक्षक आहेत. गेल्या तीन वर्षांपासून स्थायी मुख्याध्यापक नाही. देचलीपेठापासून ८० किमी अंतरावर असलेल्या शिक्षकाकडे मुख्याध्यापकाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी आधीच कमी असतानाही एका स्वयंपाक्याला मुलचेरा येथील मुलींच्या वसतिगृहात प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना दूरवर असणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत भरती केले जाते. प्रति विद्यार्थी ५० ते ६० हजार रूपये त्यावर खर्च केला जातो. दुर्गम भागात विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देणाऱ्या शाळात सोयीसुविधा नसतानाही शासकीय आश्रमशाळांच्या दुर्दशेचा विचार केला जात नाही, असा सवाल आश्रमशाळा शिक्षक, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
रोजंदारी शिक्षकांवर आश्रमशाळेचा भार
By admin | Updated: February 25, 2017 01:24 IST