लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जंगलातच हृदयविकाराचा झटका आल्याने आशिष बळवंत कुमरे (२४) या पोलीस जवानाचा शनिवारी मृत्यू झाला. या पोलीस जवानास कुरखेडा पोलीस उपमुख्यालयात शोकाकुल वातावरणात गडचिरोेली पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून रविवारी मानवंदना दिली. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाºयांनी पोलीस जवानाच्या पार्थिवावर पुष्पअर्पण करून श्रद्धांजली वाहिली. दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व इतर उपस्थित पोलीस अधिकाºयांनी मृतक पोलीस जवानाच्या कुटुंबीयांचे सात्वन केले.कुरखेडा पोलीस उपविभागाअंतर्गत असलेल्या जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी) मध्ये पोलीस जवान आशिष बळवंत कुमरे कार्यरत होता. कोरची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीपूर जंगलात १९ आॅगस्ट रोजी शनिवारला नक्षलविरोधी अभियान राबवित असताना सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घनदाट जंगलातील डोंगर उतरत असताना क्यूआरटी पथकातील पोलीस जवान आशिष कुमरे यास अचानक अस्वस्थ वाटून छातीत दुखू लागले. पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक शिवा कराडे व सहकारी जवानांनी त्याला लक्ष्मीपूर येथे आणले. येथून वाहनाने कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. रविवारी सकाळी कोरची येथे शवविच्छेदन करून शहीद जवान आशिष कुमरे यांचे पार्थिव कुरखेडा येथील पोलीस उपविभागीय कार्यालयाच्या मुख्यालयात आणण्यात आले व दुपारी २ वाजताच्या सुमारास शोकाकुल वातावरणात गडचिरोली पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरी बालाजी, विशेष अभियान पथकाचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीर साळवे, कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे, कुरखेडाचे ठाणेदार योगेश घारे, देसाईगंजचे ठाणेदार अतुल तावाडे, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल मुत्यमवार, पोलीस उपनिरीक्षक विजय वनकर, सुधीर कटारे, अमोल पवार, दांडगे, चव्हाण, क्यूआरटी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शिवा कराडे, मृतक आशिष कुमरे यांची आई इंदिराबाई कुमरे, भाऊ अमित कुमरे यांच्यासह पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना सानुग्रह आर्थिक मदत दिली. मृतक पोलीस जवान आशिष कुमरे हा ३० मे २०१२ रोजी गडचिरोली पोलीस दलात भरती झाला होता. त्याची प्रथम नियुक्ती झिंगानूरच्या क्यूआरटी पथकात झाली होती. महिनाभरापूर्वी तो कुरखेडा येथील क्यूआरटी पथकात रूजू झाला होता. आशिष अविवाहीत होता. मृतक पोलीस जवान आशिष कुमरे यांचे कुटुंबीय आरमोरी तालुक्यातील येंगाळा येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्यावर येंगाळा येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी पार्थीव हलविले.बांबूच्या स्ट्रेचरवरून लक्ष्मीपूरला आणले होतेकुरखेडा तालुक्यातील पालापुंडी (चर्वीदंड) येथील मूळ रहिवासी असलेला पोलीस जवान आशिष बळवंत कुमरे हा शनिवारी लक्ष्मीपूर जंगल परिसरात आपल्या सहकाºयांसोबत नक्षलविरोधी अभियान राबवित होता. दरम्यान डोंगर चढताना त्याची प्रकृती बिघडली. यावेळी क्यूआरटी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शिवा कराडे व सहकारी जवानांनी त्याला प्राथमिक उपचार म्हणून तोंडाद्वारे कृत्रिम श्वासोच्छवास देऊन छातीची मसाज केली. मात्र या उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून सहकारी जवानांनी त्याला लक्ष्मीपूर येथे नेण्याचा निर्णय घेतला. मात्र या जंगल परिसरात वाहतुकीची कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने पोलीस जवानांनी बांबूचे स्ट्रेचर बनवून त्यावर पोलीस जवान आशिष कुमरे याला चार किमी अंतरावरील लक्ष्मीपूर येथे आणले. येथून वाहनाने कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात कुमरे याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.पोलीस दलात कार्यरत असलेल्या वडिलांचाही असाच मृत्यूच्मृतक पोलीस जवान आशिष कुमरे यांचे वडील बळवंत कुमरे हे सुद्धा पोलीस दलात कार्यरत होते. पोलीस दलात कार्यरत असतानाच वडील बळवंत कुमरे यांचा अशाच प्रकारे आकस्मिक मृत्यू झाला होता.
आशिषच्या मृत्यूने पोलीस दलात शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:55 IST
नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जंगलातच हृदयविकाराचा झटका आल्याने आशिष बळवंत कुमरे (२४) या पोलीस जवानाचा शनिवारी मृत्यू झाला.
आशिषच्या मृत्यूने पोलीस दलात शोककळा
ठळक मुद्देपोलीस उपमुख्यालयात मानवंदना : पोलीस अधीक्षकांनी केले कुटुंबीयांचे सांत्वन