दि.१ मे रोजी जिल्ह्यात पाच लसीकरण केंद्राद्वारे १८ वर्षांवरील नागरिकांना कोविड लस देण्यास सुरुवात झाली. ऑनलाइन नोंदणी करतेवेळी आपण निवडलेल्या वेळेनुसार त्या ठिकाणी उपस्थित राहिल्यास लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही. ज्या लसीकरण केंद्राची निवड आपण नोंदविली आहे त्याच ठिकाणी लसीकरण उपलब्ध होणार आहे.
जिल्हाधिकारी सिंगला म्हणाले, अधिकच्या लसीकरण साठ्यासाठी पाठपुरावा केला असून, येत्या काळात जिल्ह्यातील उर्वरित ठिकाणीही १८ वर्षांवरील युवकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
वय वर्षे १८वरील नागरिकांसाठी सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, महिला व बाल रुग्णालय गडचिरोली, पोलीस रुग्णालय गडचिरोली, प्रा. आ. केंद्र, कोरेगाव, वडसा व उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे केंद्र सुरू होते. आता अहेरी येथील ग्रामीण रुग्णालय व आरमोरी येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी लसीकरणास प्रारंभ होत आहे.
(बॉक्स)
४५ वर्षांवरील नागरिकांसाठी ७१ केंद्र
४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे लसीकरण ७१ ठिकाणी सुरू असून, पूर्वीप्रमाणेच त्या ठिकाणी लसीकरण प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
नाव नोंदणी न करताच नागरिक लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी येत आहेत. त्यांनी आपले नाव घरूनच नोंदवावे व येताना ओळखपत्र सोबत घेऊन यावे. विनाकारण बाहेर गर्दी वाढल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो. काही अडचण आल्यास शासनाच्या टोल फ्री क्रमांक १०७५वर माहिती घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.
शंका असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधा
लसीकरणाबाबत बरेच गैरसमज समाजमाध्यमांद्वारे पसरविले जातात. लसीकरणाबाबतची नेमकी आणि विश्वासार्ह माहिती जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध असून, गैरसमज दूर करण्यासाठी त्यांची मदत घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नागरिकांनी कोविन ॲपवर, शासनाच्या टोल फ्री क्रमांक १०७५ वर, तसेच आरोग्य सेतू या ॲपवरही योग्य माहिती घ्यावी, असे त्यांनी कळविले.