काेराेनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २२ मार्चपासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले हाेते. लाॅकडाऊनच्या कालावधीत देशभरातील सर्वच उद्याेग बंद ठेवण्यात आले हाेते. त्यामुळे या कालावधीत देशभरातील मनुष्यबळ घरीच हाेते. यात अनेकांचा राेजगार हिरावल्या गेला. बहुतांश नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली. हातचा राेजगार हिरावल्याने अनेकांनी वीज बिलाचा भरणा केला नाही. या कालावधीतील काही वीज बिल माफ केेले जाईल, असे आश्वासन राज्य शासनाने दिले हाेेते. मात्र ते प्रत्यक्षात पूर्ण झाले नाही.
काेराेनाचा प्रभाव कमी हाेताच शासनाने लाॅकडाऊनची बंधने शिथिल केेली. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. राेजगार पुन्हा प्राप्त झाला. मात्र अनेकांनी वीज बिल भरले नाही. जवळपास दहा महिन्यापासून वीज बिल थकीत असल्याने व्याज बिलाची रक्कम आता वाढतच चालली आहे. वाढलेले वीज बिल आता अनेकांना भरणे कठीण झाले आहे.
बाॅक्स
हप्त्याने वीज बिल भरण्याची सुविधा
दहा महिन्याचे वीज बिल थकीत असल्याने ते एकाच वेळी भरणे कठीण हाेत आहे. त्यामुळेच अनेक ग्राहकांनी वीज बिल भरले नाही. वीज बिल भरणे शक्य व्हावे यासाठी महावितरणने सर्वच प्रकारातील वीज ग्राहकांना काही हप्ते पाडून वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली असून, आर्थिक अडचणीत असलेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे. सोबतच खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याची संधी देण्यात आली आहे. या योजनेमध्ये वीजपुरवठा सुरू असलेल्या ग्राहकांसोबतच तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले, वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीज ग्राहकांना सहभागी होता येईल. केवळ २ टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे.
बाॅक्स
गडचिराेली जिल्ह्यात औद्याेगिक ग्राहकांची संख्या अतिशय कमी आहे. घरगुती ग्राहक सर्वाधिक आहे. त्यानंतर वाणिज्य ग्राहकांची संख्या २,३३१ एवढी आहे. या वाणिज्य ग्राहकांकडे २ काेटी ६० लाख रुपये थकीत आहेत. घरगुती ग्राहकांपैकी ४० हजार ३३१ ग्राहकांकडे २४ काेटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. दहा महिन्याचा कालावधी उलटला आहे. ज्या ग्राहकाला महिन्याचे हजार रुपये बिल येत हाेते, त्याचे आता एकूण थकीत बिल १० हजाराच्या जवळपास झाले आहे. त्यामुळेच महावितरणने टप्प्याटप्प्याने वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
थकीत ग्राहकांची संख्या
ग्राहक संख्या थकीत रक्कम
घरगुती ४०,३३१ २४ काेटी
वाणिज्य २,१३१ २ काेटी ७ लाख
औद्याेगिक २३८ ६ लाख