Vaishali Thakkar Suicide: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम वैशाली ठक्करची आत्महत्या, राहत्या घरात आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 15:02 IST2022-10-16T15:02:01+5:302022-10-16T15:02:38+5:30
'यह रिश्ता क्या कहता है', 'ससुराल सिमर का' आणि बिग बॉससह अनेक मालिकांमध्ये वैशालीने काम केले.

Vaishali Thakkar Suicide: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम वैशाली ठक्करची आत्महत्या, राहत्या घरात आढळला मृतदेह
इंदूर: स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये संजनाची भूमिका साकारणारी टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने आत्महत्या केली आहे. वैशालीचा मृतदेह इंदूरच्या साईबाग येथील तिच्या घरी आढळून आला. तेजाजी नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशालीने आज(दि.16) गळफास घेतला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी एमएस हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे.
प्रेमसंबंधातील समस्येमुळे आत्महत्या?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जैनमधील महिपालपूर येथे राहणारी वैशाली ठक्कर गेल्या एक वर्षापासून इंदूरमध्ये राहत होती. तिच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली आहे. प्राथमिक तपासात तिने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या अँगलने तपास सुरू केला आहे. वैशालीने सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे, याची माहिती समोर आलेली नाही.
स्टार प्लस शोमधून लोकप्रियता मिळाली
वैशाली ठक्करने स्टार प्लसवरील शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या शोमध्ये वैशालीने संजनाची भूमिका साकारली होती. यानंतर वैशाली 'ये वादा रहा', 'ये है आशिकी', 'ससुराल सिमर का', 'सुपर सिस्टर', 'लाल इश्क' आणि 'विष-अमृत' सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले.
बिग बॉसमध्येही सहभाग
तिने आपल्या करिअरची सुरुवात अँकरिंगपासून केली होती.'सुसरल सिमर का 2' मध्ये अंजली भारद्वाजची भूमिका साकारण्यासाठी तिला नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा गोल्डन पेटल पुरस्कार देखील मिळाला आहे. वैशालीने बिग बॉसमध्येही सहभागी घेतला होता. वैशाली शेवटची 2019 च्या मनमोहिनी शोमध्ये दिसली होती. ती गेल्या 1 वर्षापासून इंदूर येथे तिच्या घरी राहत होती.