"तू इथे काय करतोय?"; 'हास्यजत्रे'च्या पहिल्याच स्कीटमध्ये ओंकार भोजने आणि वनिताचं भांडण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 11:28 IST2025-10-22T11:26:47+5:302025-10-22T11:28:31+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजनेचं कमबॅक होणार असल्याने सर्वांना उत्सुकता आहे. हास्यजत्रेच्या पहिल्याच स्कीटमध्ये ओंकार - वनिताचं भांडण होणार आहे

"तू इथे काय करतोय?"; 'हास्यजत्रे'च्या पहिल्याच स्कीटमध्ये ओंकार भोजने आणि वनिताचं भांडण
ओंकार भोजने हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय अभिनेता. ओंकारला आपण मधल्या काळात विविध सिनेमांमधून आणि रिअॅलिटी शोमध्ये भाग घेताना पाहिलंय. ओंकार भोजने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये परत कधी येणार, याची सर्व चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर काहीच दिवसांपूर्वी ओंकार भोजने परत आल्याची घोषणा सोनी मराठीतर्फे करण्यात आली आणि सर्वांना आनंद झाला. अशातच आज 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या पहिल्याच स्कीटमध्ये ओंकार आणि वनिताचं भांडण होणार आहे.
ओंकार-वनिताचं होणार भांडण
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ओंकार 'मामा' आणि वनिता 'मामी'च्या भूमिकेत पुन्हा आमनेसामने येणार आहेत. त्यावेळी ओंकार वनिताला आधी विचारतो, ''ही इथे काय करतेय?''. हे ऐकताच वनिता त्याला म्हणते, ''मी इथंच असते, तू इथे काय करतोय?'' यावर ओंकारकडे उत्तर नसतं. एकूणच बऱ्याच काळापासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये मिसिंग असलेली मामा-मामीची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. त्यामुळे आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची मजा दुप्पट होणार, यात शंका नाही.
ओंकार भोजनेचं कमबॅक होणार असल्याने सर्वजण उत्सुक आहेत. याविषयी राजश्री मराठीशी बोलताना ओंकार म्हणाला की, "मी खूप जास्त उत्सुक आहे आणि तितकंच दडपणही आहे. कारण आता तेच काम त्याच एनर्जीने पुन्हा करायचं आहे. टीमची खूप छान भट्टी जमलीये. आणि कितीही नाही म्हटलं तरी मी थोडा मागे पडलोय. कितीतरी सेमिस्टर माझ्या राहिल्या आहेत. त्या पूर्ण करायच्या आहेत. ती मजा मला नव्याने अनुभवता येणारे. प्रेक्षकांचा इतका चांगला प्रतिसाद आणि पाठिंबा असल्यामुळे मला तो विश्वास आहे आणि मी नक्कीच चांगला प्रयत्न करेन".