"हा ओलाचा स्कॅम आहे का?", कॅबचं पेमेंट वेळेत करूनही कंपनीकडून १०० रुपयांचा दंड, अभिनेत्री वैतागली
By कोमल खांबे | Updated: September 12, 2025 10:38 IST2025-09-12T10:37:53+5:302025-09-12T10:38:28+5:30
कॅब ड्राइव्हचे पैसे वेळेत देऊनही ओला कंपनीकडून अभिनेत्रीला अतिरिक्त पैशाची आणि दंड भरण्याची मागणी होत आहे. त्यामुळे अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

"हा ओलाचा स्कॅम आहे का?", कॅबचं पेमेंट वेळेत करूनही कंपनीकडून १०० रुपयांचा दंड, अभिनेत्री वैतागली
सध्या कुठेही जाण्यासाठी ओला-उबेर हा चांगला कॅब पर्याय मानला जातो. पण, कधी कधी या कंपन्यांकडून ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. असाच काहीसा अनुभव मराठी अभिनेत्री आणि लेखिका असलेल्या मधुगंधा कुलकर्णीला आला आहे. कॅब ड्राइव्हचे पैसे वेळेत देऊनही ओला कंपनीकडून अभिनेत्रीला अतिरिक्त पैशाची आणि दंड भरण्याची मागणी होत आहे. त्यामुळे अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
मधुगंधाने पोस्टमध्ये म्हटलं आहे की "मी ओला पोस्टपेड ग्राहक आहे. ४ सप्टेंबरपर्यंत मला बिल भरायचं होतं. पण मी ते ३१ ऑगस्टलाच पेमेंट केलं होतं. तरीसुद्धा मला ओला कंपनीकडून १०० रुपये दंड भरण्याचे मेसेज येत आहेत. मी ५०१ रुपयांचं पूर्ण पेमेंट केलं आहे. मी ३ वेळा त्यांना पूर्ण पुरावे आणि पेमेंटच्या स्क्रीनशॉटसह मेल केले आहेत. तरीदेखील यावर अद्याप कोणताही मार्ग निघालेला नाही".
पुढे मधुगंधाने ओला कॅबने प्रवास करताना आलेले अनुभवही सांगितले आहेत. "बहुतांश ओला ड्रायव्हर हे गाडी चालवताना आमची सुरक्षा धाब्यावर बसवून फोनवर बोलत असतात. आणि आता वेळेवर पेमेंट करूनही मला ओलाकडून त्रास दिला जात आहे. ओला त्याच्या ग्राहकांना अशा पद्धतीची वागणूक देते का? की हा कोणता स्कॅम आहे? अनेक वेळा तुम्हाला पेमेंट करायचं असतं तेव्हा ती पेमेंट लिंक उघडतच नाही. पेमेंट उशीरा करण्यात यावं आणि लेट फी चार्जेस उकळता यावेत म्हणून हे सगळं करण्यात येतंय का?", असंही तिने पुढे म्हटलं आहे. मधुगंधाच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत.