'खतरों के खिलाडी १५'चा थरार लवकरच! 'हा' महाराष्ट्रीय स्पर्धकही दाखवणार आपले कौशल्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:10 IST2026-04-28T12:05:59+5:302026-04-28T12:10:51+5:30
रोहित शेट्टीच्या या शोमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक प्रसिद्ध चेहरे धोकादायक स्टंट करताना दिसणार आहेत.

'खतरों के खिलाडी १५'चा थरार लवकरच! 'हा' महाराष्ट्रीय स्पर्धकही दाखवणार आपले कौशल्य
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि थरारक रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 15) आपल्या १५ व्या सीझनसह परतण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शेट्टीच्या या शोमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक प्रसिद्ध चेहरे धोकादायक स्टंट करताना दिसणार आहेत. यात एका महाराष्ट्रीय चेहऱ्याचाही समावेश आहे. यंदाचा सीझन खास असणार आहे, कारण यात नवीन स्पर्धकांसोबतच जुन्या सीझनमधील काही खेळाडूंचीही एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या सीझनच्या स्पर्धकांची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, गौरव खन्ना, प्रणाली राठोड, अंकित गुप्ता, इशा मालवीय, विवियन डिसेना, मनीषा राणी, दिग्विजय राठी, अरबाज पटेल, समर्थ जुरेल, धनश्री वर्मा, श्रुतिका अर्जुन, हर्ष गुजराल, चुम दरांग यांची नावे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे सोमवारी सोशल मीडियावर एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले. रुबिना दिलैक, जस्मिन भसीन, करण वाही आणि फरहाना भट हे जुने खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.
कधी होणार सुरू?
सध्या रोहित शेट्टी त्याच्या आगामी 'गोलमाल ५' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, 'खतरों के खिलाडी १५' चा प्रीमियर जून २०२६ च्या अखेरीस किंवा जुलै २०२६ च्या सुरुवातीला 'कलर्स टीव्ही'वर होण्याची शक्यता आहे. जुन्या-नव्या स्पर्धकांमधील जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षक आतापासूनच कमालीचे उत्सुक आहेत.