"आता विषय संपला नाही, तर सुरु झालाय..."; 'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर दिव्या शिंदेचा पहिला व्हिडीओ, काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 10:58 IST2026-02-11T10:56:11+5:302026-02-11T10:58:08+5:30
बिग बॉसमधून बाहेर आल्यावर दिव्या शिंदेने काहीच पोस्ट केली नव्हती. पण काही तासांपूर्वी दिव्याने एक व्हिडीओ पोस्ट करुन सर्वांना संदेश दिलाय. काय म्हणाली?

"आता विषय संपला नाही, तर सुरु झालाय..."; 'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर दिव्या शिंदेचा पहिला व्हिडीओ, काय म्हणाली?
'बिग बॉस मराठी ६' मधून दिव्या शिंदे बाहेर पडली. टास्कमध्ये सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने आणि तलवार चालवण्याची भाषा केल्याने दिव्या शिंदेला 'बिग बॉस'च्या आदेशावरुन घराबाहेर जावं लागलं. 'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर दिव्या शिंदेने काहीच पोस्ट केली नव्हती. पण काही तासांपूर्वी दिव्याने एक व्हिडीओ पोस्ट करुन सर्वांना संदेश दिलाय. ''आता विषय संपला नाही, तर सुरु झालाय'', असं म्हणत दिव्याने व्हिडीओ पोस्ट केला आहे.
काय आहे दिव्याचा व्हिडीओ?
दिव्या शिंदेने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करुन दिव्या म्हणते, ''नमस्कार जय भीम, जय शिवराय! संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून, परदेशातून तुम्ही मला जे आशीर्वाद, प्रेम आणि सपोर्ट दिलाय त्याच्यासाठी मी नेहमीच ऋणी आहे. लवकरच मी तुमच्यासमोर येईल. आता विषय संपला नाही तर विषय सुरु झालाय!'', अशा शब्दात स्पष्टपणे दिव्याने तिच्या चाहत्यांना संदेश दिला आहे.
दिव्या का काढलं घराबाहेर?
'बिग बॉस मराठी ६'मध्ये झालेल्या टास्कमध्ये घरात सहभागी नसलेल्या सदस्याच्या चेहऱ्यावर क्रॉस चिन्हाचं लाल रंगाचं पेंट मारायचं होतं. जेव्हा तन्वीची वेळ आली तेव्हा तिने दिव्याचं नाव घेतलं. दिव्याला हे ऐकताच राग अनावर झाला. तिने बिग बॉसच्या घरातील सदस्यांना उद्देशून तलवार चालवण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. बिग बॉसने तिला रोखलं तरीही दिव्या ऐकत नव्हती. ''हो ही धमकीच आहे'', असं दिव्या वारंवार म्हणत राहिली.
झालेली चूक सुधारण्याची दिव्याला बिग बॉसने संधी दिली. परंतु दिव्या तिच्या म्हणण्यावर ठाम होती. राकेशने सुद्धा दिव्याला भाषा जपून वापर, असा सल्ला दिला. परंतु दिव्या ऐकत नव्हती. शेवटी पुढच्या दिवशी सर्व सदस्य हॉलच्या भागात आले असताना दिव्याकडून झालेल्या मोठ्या चुकीचा बिग बॉसने उल्लेख केला. सदस्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बिग बॉसने दंड म्हणून दिव्याला तातडीने घरातून बाहेर काढण्यात आलं होतं.