'बिग बॉस मराठी' गाजवणाऱ्या सूरज चव्हाणची रुपेरी पडद्यावर 'झापुक झुपूक' एन्ट्री, झळकणार 'या' सिनेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 16:53 IST2024-08-22T16:52:46+5:302024-08-22T16:53:16+5:30
सूरज चव्हाण सध्या बिग बॉस मराठी गाजवत असून तो लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार असून या सिनेमाच्या माध्यमातून तो अभिनय क्षेत्रात पदार्पण करतोय

'बिग बॉस मराठी' गाजवणाऱ्या सूरज चव्हाणची रुपेरी पडद्यावर 'झापुक झुपूक' एन्ट्री, झळकणार 'या' सिनेमात
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये एकापेक्षा एक सोशल मीडिया स्टार आहेत. यामध्ये सूरज चव्हाणची सध्या चर्चा आहे. सूरजचा खेळ, त्याचा स्वभाव. तो कोणतीही तक्रार न करता घरात करत असलेली कामं अशा सर्व गोष्टींचं कौतुक होत आहे. सध्या तमाम महाराष्ट्राचं प्रेम मिळवणाऱ्या सूरजच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सूरजची आता एका मराठी सिनेमात एन्ट्री होणार असून रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालायला सूरज सज्ज आहे.
या मराठी सिनेमा झळकणार सूरज
सध्या 'बिग बॉस मराठी' मुळे सूरज भलतात चर्चेत आलेला पाहायला मिळतोय. लवकरच सूरज त्याच्या आगामी 'राजाराणी' या सिनेमातून मोठा पडदा गाजवताना दिसणार आहे. सत्य घटनेवर आधारित प्रेम कथेतून सूरज महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या दोस्ताच्या भूमिकेत सूरजला पाहणं फारच रंजक ठरणार आहे. रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे हे कलाकार सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. १८ ऑक्टोबर २०२४ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. शिवाजी दोलताडे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.
बिग बॉसचं घर सूरज गाजवतोय
सूरज चव्हाण सध्या बिग बॉस मराठीचं घर चांगलंच गाजवताना दिसतोय. सूरजचे झापुकझुपूक, गोलीगत धोका, बुक्कीत टेंगूळ हे डायलॉग चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. इतकंच नव्हे तर भाऊच्या धक्क्यावर अक्षय कुमारने सूरजच्या डायलॉगची नक्कल केली. रितेशने सुद्धा भाऊच्या धक्क्यावर सूरजच्या खेळाचं कौतुक केलंय. पहिल्या आठवड्यात शांत दिसलेला सूरज आता मात्र घरात एकदम जोशात खेळताना दिसतोय.