'साडीत चांगली दिसतेस' असा मेसेज पाठवणं अभिनेत्याला भोवलं, महिलांनी स्क्रीनशॉट दाखवून केली पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 10:21 IST2025-11-04T10:17:24+5:302025-11-04T10:21:35+5:30
महिलांचं कौतुक करणं अभिनेत्याच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. महिलांनी थेट अभिनेत्याने केलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट दाखवत त्याची पोलखोल केली आहे

'साडीत चांगली दिसतेस' असा मेसेज पाठवणं अभिनेत्याला भोवलं, महिलांनी स्क्रीनशॉट दाखवून केली पोलखोल
एका अभिनेत्याला महिलांचं कौतुक करणं चांगलंच भोवलं आहे. हा अभिनेता आहे रिजु विश्वास. बंगाली टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता रिजु विश्वास (Riju Biswas) एका मोठ्या वादामुळे अडचणीत आला आहे. सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर महिलांना अनपेक्षित मेसेज पाठवल्याचा आरोप रिजु विश्वासवर केला गेला आहे. या आरोपांमुळे त्याला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला असून, आता प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार, रिजु विश्वासने अनेक महिलांना व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने मेसेज पाठवले. यामध्ये तो अनेकदा एकच गोष्ट लिहायचा की, ''साडीत चांगली दिसतेस''. कोलकाता येथील अनेक महिलांनी रिजुवर असा आरोप केला आहे की, तो शेकडो महिलांना मेसेज पाठवून त्यांच्याशी फ्लर्ट करत होता. एका महिलेने रिजुने पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर केला. यानंतर अनेक महिला पुढे आल्या आणि त्यांनीही त्यांना आलेले असेच अनुभव आणि मेसेजचे स्क्रीनशॉट ऑनलाइन पोस्ट केले. यामुळे रिजु विश्वासची पोलखोल झाली.
अभिनेत्याचं स्पष्टीकरण
हे प्रकरण बाहेर येताच रिजूने महिलांना मेसेज पाठवल्याचं कबूल केलंय. पण त्याने स्वतःची बाजूही मांडलीये. तो म्हणाला- "मला खोटं बोलायला आवडत नाही. मी हे मेसेज पाठवतो, पण कोणाचं कौतुक करण्यात काय वाईट आहे? कोणीतरी साडीत चांगली दिसत आहे, असं म्हणणं ही एक साधी प्रशंसा आहे. मी माझ्या आईलाही हेच म्हणतो." रिजु विश्वासने सायबर गुन्हे विभागात तक्रार दाखल केली आहे. त्याने दावा केला आहे की, या स्क्रीनशॉटमुळे आणि सोशल मीडियावरील टीकेमुळे त्याच्या प्रायव्हसीचे उल्लंघन झाले असून त्याला छळाचा सामना करावा लागत आहे.