हसायला येत नसेल तरीही 'हास्यजत्रे'त हसावं लागतं? सई ताम्हणकर स्पष्टच म्हणाली- "या गोष्टीचं बंधन..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 14:14 IST2025-10-22T14:13:05+5:302025-10-22T14:14:25+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये परीक्षक म्हणून बसलेल्या सई ताम्हणकरने प्रथमच हा खुलासा केला आहे. याशिवाय हास्यजत्रेची दुसरी बाजू सांगितली

हसायला येत नसेल तरीही 'हास्यजत्रे'त हसावं लागतं? सई ताम्हणकर स्पष्टच म्हणाली- "या गोष्टीचं बंधन..."
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो. या शोमध्ये हास्यमहारथी प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या सर्व स्कीट पाहून सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक त्यांचं उत्स्फुर्त मत व्यक्त करतात. इतकंच नव्हे तर, प्रत्येक स्कीट पाहताना हे दोघंही खळखळून हसतात आणि कलाकारांना दाद देतात. अशावेळी खोटं हसावं लागतं का? याविषयी सई ताम्हणकरने तिचं स्पष्ट मत व्यक्त केलंय.
अमुक तमुकला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली की, ''मी दोन महत्वाचे मुद्दे सांगते. याचं पूर्ण क्रेडिट चॅनलला आणि आमच्या दिग्दर्शकांना जातं. आम्हा दोघांनाही म्हणजे पश्याजींना आणि मला कोणीही असं सांगितलं नाही की, थोडंसं हसा. आम्हाला हसायला येत नसेल तर आम्ही ढिम्म बसलेलो असतो, आम्ही हसत नाही. कधीकधी उलट मीच पश्याजींना असं म्हणते, हाय पश्याजी! स्माईल.. त्यामुळे हे खूप मदत करतं की, तुमच्यावर काही प्रेशर नाहीये की, हसाच! कारण तुम्हाला हसायला बसवलंय. आम्ही तिथे एन्जॉय करायला आणि खऱ्या अर्थाने हास्यरसिक म्हणून बसलोय. आम्ही त्याचा आस्वाद घ्यायला बसलोय. हे बंधन नसणं, खूप महत्वाचं आहे.''
''दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या दिवसापासून आम्हाला कोणीच सांगितलं नाही हे बोला आणि हे बोलू नका. आम्हाला कायमच असं सांगितलं गेलं की, एक्सप्रेस. व्यक्त व्हा. काय ठेवायचं, काय नाही हे आमच्या हातात आहे. पण तुम्ही व्यक्त व्हा. असं स्वातंत्र्य जेव्हा मिळतं तेव्हा तुम्ही छान व्यक्त होता. हे फ्रीडम आपल्याला अशा शोमध्ये खूप क्वचित बघायला मिळतं. त्यामुळे आमच्या शोच्या यशाचं गमक हेही असावं. हा आमच्या शोचा महत्वाचा भाग आहे.'', अशाप्रकारे सईने तिचं मत व्यक्त केलंय. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये आता सर्वांचा लाडका कलाकार ओंकार भोजनेचं कमबॅक होत असल्याने सर्वांना उत्सुकता आहे.