बापरे! प्रसिद्ध अभिनेत्रीने लोकांवर फटाके फेकले, भर रस्त्यात घातला गोंधळ, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 16:16 IST2025-10-24T16:15:49+5:302025-10-24T16:16:54+5:30
प्रसिद्ध अभिनेत्रीने भर रस्त्यात तमाशा केला असून लोकांवर फटाके फेकले. त्यामुळे सर्वांनी तिच्यावर राग व्यक्त केला आहे

बापरे! प्रसिद्ध अभिनेत्रीने लोकांवर फटाके फेकले, भर रस्त्यात घातला गोंधळ, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अभिनेत्रीने भर रस्त्यात लोकांवर फटाके फेकल्याने ती चांगलीच चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे खुशी मुखर्जी. नेहमीच आपल्या बोल्ड अदा आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री खुशी मुखर्जीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. काय घडलंय नेमकं?
खुशीने भर रस्त्यात लोकांवर फेकले फटाके
दिवाळीच्या धामधुमीत मुंबईच्या रस्त्यावर खुशीने चांगलाच गोंधळ घातला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये खुशी मुखर्जी भर रस्त्यात एका फटाक्यांच्या दुकानदारासोबत आणि पोलिसांसोबत वाद घालताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, मुंबईतील अंधेरी लोखंडवाला परिसरात ही घटना घडली. अभिनेत्रीच्या निळ्या रंगाच्या मर्सिडीज गाडीला कुणीतरी धडक दिली आणि तो पळून गेला. यामुळे संतापलेल्या खुशीने रस्त्यावरच गोंधळ घालायला सुरुवात केली.
खुशीचा राग अनावर झाल्याने ती फटाक्यांच्या दुकानासमोर उभी राहून मोठ्याने ओरडताना दिसली. "माझ्या गाडीला धडक देऊन पळून गेला आणि तुम्हाला फटाके विकायचे आहेत," असं म्हणच ती व्हिडिओमध्ये गोंधळ घालताना दिसतेय. यावर फटाके विक्रेता तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता की, "तुमच्या गाडीचं जे नुकसान झालं त्यासाठी आम्ही का जबाबदार? तुमच्या गाडीचा आम्ही ठेका घेतलाय का?". दुकानदाराने समजावलं तरीही खुशीचा राग शांत न होता तिने दुकानातून फटाके उचलले आणि रस्त्यावर फेकून दिले. काही फटाक्यांचे बॉक्स ती लोकांवर फेकताना दिसतेय.
यामुळे त्या ठिकाणी लोक गोळा झाले. पोलिसांनाही यावं लागलं. खुशी आणि पोलिसांमध्येही वाद झाला. तिची पोलिसांसोबतही जोरदार बाचाबाची झाली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे खुशी मुखर्जीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. याशिवाय तिथे उपस्थित असलेल्या लोकांचा रागही अनावर झाला आहे. स्वतःचं नुकसान झाल्यावर शांत न बसता सामान्य फटाके विक्रेत्याचं नुकसान केल्याने, खुशीवर सर्वांनी आगपाखड केली आहे.