उदयपूरमध्ये रश्मिका-विजयचा लग्नसोहळा, तेलुगू रितीनंतर आता 'कोडावा' पद्धतीने लग्नाचा थाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 17:38 IST2026-02-26T17:31:25+5:302026-02-26T17:38:20+5:30
रश्मिका-विजयन तेलुगू पद्धतीनं लग्नगाठ बांधल्यानंतर टीमकडून मिठाईचं वाटप झालं. तेलुगू पद्धतीनंतर ही जोडी 'कोडावा' रितीरिवाजाने पुन्हा विवाह करणार आहे.

उदयपूरमध्ये रश्मिका-विजयचा लग्नसोहळा, तेलुगू रितीनंतर आता 'कोडावा' पद्धतीने लग्नाचा थाट
Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Telugu Kodava Wedding: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकं आणि बहुचर्चित जोडपं विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. उदयपूरमध्ये 'आयटीसी मेमेंटोज' या आलिशान रिसॉर्टमध्ये हा शाही विवाह सोहळा अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडतोय. या जोडीने आज, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी तेलुगू परंपरेनुसार लग्नगाठ बांधली. या सोहळ्यानंतर आता सर्वांचे लक्ष संध्याकाळी होणाऱ्या पारंपारिक 'कोडावा' विवाह विधीकडे लागले आहे.
रश्मिका आणि विजयचे लग्न दोन वेगवेगळ्या संस्कृतींनुसार होत आहे. आज सकाळी पारंपारिक तेलुगू रितीरिवाजांनुसार हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर आता रश्मिका ही कर्नाटकच्या कुर्ग प्रदेशातील कोडावा समुदायाची असल्याने, दुपारी ४ वाजल्यापासून कोडावा (कुर्ग) रितीरिवाजांनुसार पुन्हा लग्नगाठ बांधण्यात येणार आहे.
काय आहे कोडावा लग्नाचं वैशिष्ट्य?
कोडावा विवाह हे सामान्य हिंदू लग्नांपेक्षा वेगळे असतात. यात सहसा ब्राह्मण पुजारी मंत्र म्हणत नाहीत, तर घरातील वडीलधारी मंडळी पवित्र दिव्यासमोर पूर्वजांचे स्मरण करून विधी पार पाडतात. वधू एक विशेष पद्धतीची साडी परिधान करते, तर वर पारंपारिक पोशाखात असतो. या लग्नात तांदूळ टाकून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले जातात. कोडावा लग्नपद्धतीत परंपरा, कुटुंबकेंद्री मूल्ये आणि योद्धा संस्कृतीचा अनोखा संगम दिसून येतो.
लग्नानंतर वाटली मिठाई
तेलगू पद्धतीने लग्नाचे विधी पार पडल्यानंतर रश्मिका आणि विजयच्या टीमने मीडिया, पापाराझी आणि तिथल्या गरीबा मुलांना मिठाईचे वाटप केले. मिठाईच्या डब्यांवर रश्मिका मंदानाचा फोटो लावण्यात आला होता. या जोडप्याच्या या कृत्याने सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकली असून, त्यांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.
'गीता गोविंदम' ते उदयपूरमध्ये लग्न
रश्मिका आणि विजयची प्रेमकहाणी 'गीता गोविंदम' चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर रविवारी सोशल मीडियावरून त्यांनी अधिकृत घोषणा केली आणि आज उदयपूरमध्ये जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.