प्रभासच्या 'फौजी' सिनेमाच्या टीमसोबत भयंकर घटना! एकाचा मृत्यू आणि ५ गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:32 IST2026-05-06T13:31:11+5:302026-05-06T13:32:26+5:30
प्रभासच्या 'फौजी' सिनेमाच्या टीमसोबत भयंकर घटना घडली आहे. या अपघतात एका सदस्याचा मृत्यू झाला आहे. तर इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्रभासच्या 'फौजी' सिनेमाच्या टीमसोबत भयंकर घटना! एकाचा मृत्यू आणि ५ गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
साऊथ स्टार प्रभासच्या 'फौजी' सिनेमाच्या टीमसोबत भयंकर घटना घडली आहे. हैदराबाद जवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघतात एका सदस्याचा मृत्यू झाला आहे. तर इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर 'फौजी' सिनेमाचं शूटिंग तात्काळ थांबवण्यात आलं आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, सिनेमाच्या शूटसाठी सेटवर जात असतानाच रामोजी फिल्म सिटीला जाताना हैदराबादजवळ असलेल्या अब्दुल्लापुरमेटजवळ हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी डिव्हायडरवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भयंकर होता टीममधील एका सदस्याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर ५ जण गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. याबाबत पोलीस अधिक तपास करत असून नेमका अपघात कशामुळे झाला याचा शोध घेत आहेत. अद्याप या अपघाताची माहिती किंवा त्याबाबत 'फौजी' सिनेमाच्या टीमकडून किंवा प्रभासकडून कोणतीही ऑफिशियल माहिती देण्यात आलेली नाही. प्रभास 'फौजी' सिनेमात एका ब्रिटीश सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. १९४५ या सालातील घटनेवर सिनेमाची कथा आधारित आहे. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, जया प्रदा, अभिनेत्री इमानवी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन हनु राघवपुडी यांनी केलं आहे.