Dacoit Teaser: अदिवी शेष आणि मृणाल ठाकूरच्या 'डकैत'चा जबरदस्त टीझर; अनुराग कश्यपच्या खलनायकाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:18 IST2025-12-18T13:14:59+5:302025-12-18T13:18:53+5:30
अदिवी शेष आणि मृणाल ठाकूरच्या 'डकैत' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. अनुराग कश्यपने रंगवलेल्या खलनायक सर्वांचं लक्ष वेधून गेला आहे

Dacoit Teaser: अदिवी शेष आणि मृणाल ठाकूरच्या 'डकैत'चा जबरदस्त टीझर; अनुराग कश्यपच्या खलनायकाची चर्चा
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित 'डकैत' (Dacoit) या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला असून, यात मृणाल ठाकूर आणि अदिवी शेष यांची केमिस्ट्री तसेच जबरदस्त ॲक्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या हा टीझर केवळ तेलुगू भाषेत प्रदर्शित करण्यात आला असला, तरी त्यातील दृश्यांनी हिंदी प्रेक्षकांचीही उत्सुकता वाढवली आहे.
१ मिनिट ३१ सेकंदांच्या टीझरमध्ये काय आहे?
टीझरची सुरुवात अदिवी शेषच्या रोमँटिक लूकने होते, जिथे तो एका रोमँटिक हिरोच्या रूपात दिसतो. मात्र, जसा टीझर पुढे सरकतो, तसे चित्रपटातील कथानक ॲक्शनकडे वळते. मृणाल ठाकूर आपल्या नेहमीच्या शैलीत अतिशय सुंदर दिसत आहे. टीझरमध्ये केवळ प्रेमकथाच नाही, तर जबरदस्त ॲक्शन आणि गंभीर संवादही पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, टीझरच्या शेवटी बॉलिवूडचा दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यप याचीही झलक पाहायला मिळते.
या चित्रपटात अनुराग कश्यप नकारात्मक भूमिकेत असून त्याचा लूक सर्वांना धडकी भरवणारा आहे. अनुराग कश्यप यांच्यासोबतच प्रकाश राज आणि मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी यांसारखे दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
शनिल देव दिग्दर्शित हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, या तारखेला बॉक्स ऑफिसवर मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण याच दिवशी रणवीर सिंगचा 'धुरंधर' भाग २ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार यश याचा 'टॉक्सिक' हे दोन मोठे चित्रपटही प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत 'डकैत' या दोन मोठ्या चित्रपटांसमोर कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'डकैत'चा हा टीझर पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला असून, अनुराग कश्यप आणि अदिवी शेष यांच्यातील आमना-सामना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. लवकरच या चित्रपटाचा हिंदी टीझर देखील प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.