"माझं कुटुंब, माझी व्यक्ती आता...", ३१ वर्षीय अभिनेत्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 17:01 IST2026-05-11T16:58:23+5:302026-05-11T17:01:05+5:30
भरतच्या मृत्यूनंतर त्याची बेस्ट फ्रेंड आणि अभिनेत्री आशू रेड्डी हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

"माझं कुटुंब, माझी व्यक्ती आता...", ३१ वर्षीय अभिनेत्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीची भावुक पोस्ट
साऊथ सिनेसृष्टीतील ३१ वर्षीय अभिनेता भरत कांत आणि प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर जी. साई त्रिलोक यांच्या भीषण रस्ते अपघातात झालेल्या मृत्यूने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली. हैदराबादच्या आऊटर रिंग रोड येथे हा अपघात झाला. भरत कांतच्या कारने पुढे जाणाऱ्या एका कंटेनर ट्रकला मागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला. भरतच्या मृत्यूनंतर त्याची बेस्ट फ्रेंड आणि अभिनेत्री आशू रेड्डी हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
आशू रेड्डीने पोस्टमध्ये म्हटलं आहे की "हे माझं वैयक्तिक नुकसान आहे. माझा बेस्ट फ्रेंड, माझं कुटुंब, माझी व्यक्ती आता शिवासोबत आहे. तुझ्यासाठी मला अशी पोस्ट करावी लागेल जी तुझ्यापर्यंत कधी पोहोचणारच नाही, असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता पुन्हा आपली भेट होईपर्यंत तुझं हास्य आणि तुझा चेहरा आठवणीत राहील. भारत तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही. माझं हृदय तुटलंय, तुला बाय म्हणायला जड जातंय",
भरत कांत हा एक नवोदित अभिनेता होता, तर त्रिलोक हे कॅमेरामन म्हणून कार्यरत होते. दोघेही सुमारे १० वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी हैदराबादला आले होते. मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली होती. पण त्यांच्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला. याशिवाय तेलुगू चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.