Bads Of Bollywood Review: मनोरंजनाचं पैसा वसूल पॅकेज; आर्यन खानची 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिज कशी आहे? वाचा रिव्ह्यू

By देवेंद्र जाधव | Updated: September 19, 2025 13:13 IST2025-09-19T12:51:41+5:302025-09-19T13:13:45+5:30

Bads Of Bollywood Review : शाहरुखचा लेक आर्यन खानची बहुचर्चित वेबसीरिज कशी आहे. जाणून घेण्यासाठी रिव्ह्यू नक्की वाचा

Bads Of Bollywood Review aryan khan shahrukh khan bobby deol netflix | Bads Of Bollywood Review: मनोरंजनाचं पैसा वसूल पॅकेज; आर्यन खानची 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिज कशी आहे? वाचा रिव्ह्यू

Bads Of Bollywood Review: मनोरंजनाचं पैसा वसूल पॅकेज; आर्यन खानची 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिज कशी आहे? वाचा रिव्ह्यू

Release Date: September 18,2025Language: हिंदी
Cast: लक्ष्य ललवानी, बॉबी देओल, अन्य सिंग, मोना सिंग, मनीष चौधरी, राघव जुएल, साहिर बंबा, मनोज पाहवा
Producer: रेड चिलिज एंटरटेनमेंट, गौरी खानDirector: आर्यन खान
Duration: ५ तास ३५ मिनिटं/ ७ एपिसोडGenre:
लोकमत रेटिंग्स

बॉलिवूड म्हटलं की पैसे, प्रसिद्धी, ग्लॅमर अशा अनेक गोष्टी सामान्य माणूस म्हणून आपल्याला दिसतात. दर शुक्रवारी रिलीज होणारा सिनेमा हा एखाद्या कलाकाराला रातोरात स्टार करतो, किंवा त्याचं करिअर उद्धवस्त करतो. बॉलिवूडच्या झगमगाटाच्या दुनियेमागे सेलिब्रिटींचं आयुष्य अनेक रहस्यांनी भरलेलं असतं. त्यांच्याही आयुष्यात सर्वसामान्य माणसांसारख्याच अडचणी असतात. कलाकारांच्या चेहऱ्यावरील हा हसरा मुखवटा उतरला की, त्यांचंही आयुष्य दुःखाने भरलेलं असतं. शाहरुखचा लेक आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या माध्यमातून याच जगाचं मार्मिक चित्र समोर आणलंय. कशी आहे ही वेबसीरिज? जाणून घ्या.

कथानक:
 
 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'ची कथा आसमान सिंग (लक्ष्य ललवानी) या कलाकाराभोवती फिरते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला नवीन अभिनेता म्हणून आसमानची चर्चा असते. त्याचा 'रिव्हॉल्व्हर' नावाचा पहिलाच सिनेमा सुपरहिट होतो. त्यामुळे आसमान रातोरात स्टार होतो. आसमानसाठी बॉलिवूडची दारं उघडली जातात. मध्यमवर्गीय घरातून आलेल्या आसमानला बॉलिवूडचे छक्केपंजे माहित नसतात.

पुढे त्याला करण जोहरच्या एका लव्हस्टोरीमध्ये काम करण्याची संधी मिळते. याच सिनेमातून बॉलिवूड सुपरस्टार अजय तलवारची (बॉबी देओल) मुलगी करिश्मा पदार्पण करणार असते. परंतु आपल्या मुलीने आसमानसोबत काम करु नये, अशी अजयची इच्छा असते. त्यामुळे तो आसमानला या सिनेमातून काढून टाकण्यासाठी सापळा रचतो. बॉलिवूडच्या जगात नवखा असलेला आसमान या चक्रव्यूहात अडकतो. अजय तलवार आसमानवर इतका नाराज का असतो? बॉलिवूडच्या जीवघेण्या स्पर्धेत आसमानचा निभाव लागतो का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून मिळतील. 



दिग्दर्शन:

शाहरुखचा मुलगा आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चं दिग्दर्शन केलंय. दिग्दर्शक म्हणून आर्यनची ही पहिलीच कलाकृती असली तरीही कथेवर त्याने केलेलं काम जबरदस्त आहे. कथेतले छोटे छोटे बारकावे आर्यनने प्रेक्षकांसमोर व्यवस्थित आणले आहेत. 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या कथेचा आवाका मोठा असला तरीही आर्ययने प्रभावी दिग्दर्शन करुन प्रत्येक गोष्टीला न्याय दिला आहे.

आर्यन एका बाजूला आसमानचा संघर्षही दाखवतो, तर दुसऱ्या बाजूला बॉलिवूड दुनियेतील उणीवाही समोर आणतो. इमरान हाश्मी, शाहरुख, सलमान, आमिर, अर्शद वारसी, राजामौली असे अनेक मोठे कलाकार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत वेबसीरिजमध्ये दिसतात. कथेचा भाग म्हणून आर्यनने या सर्व सेलिब्रिटींचा चांगला वापर केला आहे. विशेष म्हणजे, आर्यनने त्याच्याच आयुष्यात घडलेल्या ड्रग्ज प्रकरणाचं विडंबन केलंय.

इतकंच नव्हे, स्वतः शाहरुख खान निर्माता म्हणून पाठीशी असल्याने पुरस्कार सोहळे, सिनेमाचं शूटिंग, सेलिब्रिटींचा बंगला, अॅक्शन सीन्स अशा गोष्टी भव्य पद्धतीने आर्यनने समोर आणल्या आहेत. पहिलीच कलाकृती असली तरीही लेखक-दिग्दर्शक म्हणून आर्यनने प्रचंड मेहनत घेतलेली आहे. त्यामुळेच वेबसीरिजचा प्रत्येक एपिसोड पैसा वसूल मनोरंजन करतो.  



अभिनय:

लक्ष्य ललवानीने आसमान सिंगच्या भूमिकेत उत्तम काम केलंय. नवख्या कलाकाराला बॉलिवूडमध्ये करावा लागणारा स्ट्रगल, वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात होत असलेली घुसमट अशा अनेक भावना लक्ष्यने प्रभावीपणे दाखवल्या आहेत. आसमानच्या मित्राच्या भूमिकेत राघव जुएल मन जिंकतो. डान्सर असलेला राघव आता अभिनयात सुद्धा चांगलाच भाव खातोय. इमरान हाश्मीसोबत असलेल्या एका सीनमध्ये राघवने केलेली अदाकारी ओठांवर हसू आणि डोळ्यात पाणी आणते.

सुपरस्टार अजय तलवारच्या भूमिकेत बॉबी देओलही छाप पाडतो. सुपरस्टारपदाचं वलय मिरवताना वैयक्तिक आयुष्यात होत असलेली फरफट बॉबीने आर्तपणे दाखवली आहे. आसमानच्या काकांची भूमिका मनोज पाहवा मिश्किलपणे साकारतात. मोना सिंग, साहिर बंबा, अन्य सिंग, मनीष चौधरी, गौतमी कपूर असे अनेक कलाकार त्यांच्या व्यक्तिरेखांना न्याय देतात. बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रिटींचे कॅमिओ पाहणं ही एक पर्वणी आहे.

चांगल्या बाजू: दिग्दर्शन, कथा, अभिनय, ग्लॅमरच्या पलीकडे दाखवलेलं जग, क्लायमॅक्स
नकारात्मक बाजू: वेबसीरिजमधील गाणी 

रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या, मीडिया, पुरस्कार सोहळे, नियमित शूटिंग अशा अनेक गोष्टी बॉलिवूड कलाकारांच्या जगण्याचा भाग असतात. कायम फॅन्स आणि माणसांच्या गराड्यात असलेले हे सेलिब्रिटी खऱ्या जीवनात मात्र काहीशा एकटेपणाचा सामना करतात. 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेबसीरिज सुपरस्टार कलाकारांच्या आयुष्यातील हेच अंतरंग उलगडून दाखवते.

वरवर भुरळ घालणाऱ्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील काहीशी काळी बाजू या सीरिजमधून समोर येते. त्यामुळे सामान्य प्रेक्षक म्हणून आपण थक्क होतो. आर्यन खानने पहिल्याच कलाकृतीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. आर्यनकडून अशाच उत्तमोत्तम कलाकृतींची अपेक्षा आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सवर  'बॅड्स ऑफ बॉलिवूड' बघून तुमचं मनोरंजन होईल, याची खात्री.

Web Title: Bads Of Bollywood Review aryan khan shahrukh khan bobby deol netflix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.