"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 10:56 IST2026-04-30T10:56:20+5:302026-04-30T10:56:46+5:30
कोरिग्राफर प्रियंकावर वैतागला, मग कतरिना कैफने..., प्रियंका चोप्रा काय म्हणाली?

"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने आज आपल्या अभिनयाने जगभरात ओळख निर्माण केली असली तरी सुरुवातीच्या काळात तिला डान्समध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. करिअरच्या सुरुवातीला ती एक अतिशय 'वाईट' डान्सर होती असं तिने एका मुलाखतीत मान्य केलं. एकाच वेळी कोरिओग्राफी लक्षात ठेवणे, अभिनय करणे आणि सहकलाकाराशी समन्वय साधणे तिच्यासाठी कठीण जात होतं. त्यावेळी कतरिना कैफने तिची मदत केली होती. काय आहे तो किस्सा?
प्रियांका चोप्राने तिच्या चित्रपटाच्या शूटिंगवेळी घडलेला एक किस्सा सांगितला. 'वोग अरेबिया'ला दिलेल्या मुलाखतीत प्रियंका म्हणाली, "मी करिअरची सुरुवात केली तेव्हा अतिशय वाईट डान्सर होते. मला अभिनय आणि हव्या तशा डान्स स्टेप्स एकत्र करणं जमत नव्हतं. त्यात सहकलाकारांशी समन्वय साधणंही कठीण होतं. माझ्या १९-२० वर्षांच्या मेंदूला एकाच वेळी बऱ्याच गोष्टी कराव्या लागत होत्या."
ती पुढे म्हणाली, "मी दक्षिण आफ्रिकेत शूट करत होते आणि राजू खान आमचे कोरिओग्राफर होते. मी सतत स्टेप्स विसरत होते. ते माझ्यावर प्रचंड वैतागले आणि त्यांनी रागात माईकच फेकून दिला. ते म्हणाले, 'तू ब्युटी पेजेंट स्पर्धेतून भले आली असशील पण अभिनेत्री होण्यापूर्वी डान्स शिकून घे'. ते तिथून निघून गेले आणि सगळ्यांसमोर ओरडल्याने माझी मान शरमेने खाली गेली. मी आणि राजू आज चांगले मित्र आहोत."
ती पुढे म्हणाली, "या आव्हानावर मात करण्यासाठी मी कतरिना कैफची मदत घेतली. त्यावेळी कतरिना बॉलिवूडमध्ये नवीन होती, पण तिच्या डान्स कौशल्याचं खूप कौतुक व्हायचं.मी कतरिनासोबत दिवसातून सहा-सहा तास डान्सचा सराव केला ज्यामुळे माझ्या डान्समध्ये सुधारणा झाली."
त्यानंतरच्या काळात प्रियांकाने 'देसी गर्ल' आणि 'राम चाहे लीला' सारख्या गाण्यांतून आपल्या नृत्याची जादू दाखवून दिली.
प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच ती 'द ब्लफ' या ॲक्शन चित्रपटात झळकली, ज्याला जगभरात उत्तम प्रतिसाद मिळाला. आता प्रियांका आठ वर्षांनंतर भारतीय सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहे. दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या 'वाराणसी' या मेगा प्रोजेक्टमध्ये ती महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत दिसणार आहे. हा चित्रपट एप्रिल २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.