Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 15:27 IST2026-04-28T15:19:15+5:302026-04-28T15:27:21+5:30

Harsha Richhariya : हर्षा रिछारियाने आपल्यावर झालेल्या आरोपांना सडेतोड उत्तर देत एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने सर्व आरोप फेटाळून लावले

उज्जैनमध्ये संन्यास घेण्यावरून निर्माण झालेल्या वादाने आता एक नवं वळण घेतलं आहे. हर्षा रिछारियाने आपल्यावर झालेल्या आरोपांना सडेतोड उत्तर देत एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने सर्व आरोप फेटाळून लावले आणि आरोप करणाऱ्यांना थेट आव्हानही दिलं आहे.

हर्षा रिछारियाने म्हटलं आहे की, जर तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांपैकी एकही आरोप सिद्ध झाला, तर ती तिची संपूर्ण संपत्ती दान करेन. मात्र, जर सर्व आरोप खोटे ठरले, तर आरोप करणाऱ्यांविरुद्ध १ कोटीचा मानहानीचा खटला दाखल करेल.

आपल्यावर होणाऱ्या आर्थिक आरोपांची सत्यता समोर यावी यासाठी आपण बँक डिटेल्स सार्वजनिक करण्यास पूर्णपणे तयार आहोत, असंही हर्षाने स्पष्ट केलं.

हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा भोपाळची रहिवासी असलेल्या हर्षा रिछारियाने स्वतःचं पिंडदान करून संन्यास घेण्याची आणि सनातन धर्माचा पुनर्स्विकार करण्याची घोषणा केली. उज्जैनच्या मौनी तीर्थ आश्रमात तिला सुमनानंदजी महाराज यांनी दीक्षा दिली. त्यानंतर ती स्वामी हर्षानंद गिरी या नावाने ओळखली जाऊ लागली.

हर्षाला संत समाजाच्या एका वर्गाने मान्यता दिलेली नाही. मध्य प्रदेश संत समितीचे अध्यक्ष अनिलानंद महाराज यांनी त्यांच्या संन्यासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अनिलानंद यांच्या मते, संन्यास ही काही साधी प्रक्रिया नाही, तर ती अनेक वर्षांची तपश्चर्या, शिस्त आणि साधनेचं फळ असतं. अशा परिस्थितीत वारंवार संन्यास घेण्यासारख्या घटनांमुळे सनातन परंपरांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो.

अनिलानंद महाराज यांनी असाही आरोप केला आहे की, या संपूर्ण प्रकरणामागे परदेशी फंडिंगचा हात असू शकतो आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. परंपरांशी कोणत्याही प्रकारची छेडछाड होऊ नये यासाठी त्यांनी आखाडा परिषदेने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

हर्षा रिछारियाने हे सर्व आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं म्हटलं असून त्या कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहेत. आपण सनातन धर्म आणि त्यांच्या परंपरांचं पूर्ण श्रद्धेने पालन करत आहोत आणि केवळ आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी हे आरोप केले जात आहेत, असं तिचं म्हणणं आहे.

हर्षा रिछारिया प्रयागराज महाकुंभादरम्यान चर्चेत आली होती आणि तेव्हापासून ती सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात आहेत. अनेकदा तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.