गरोदर असताना केवळ 31व्या वर्षीच झाला होता मृत्यू, बिग बींच्या अभिनेत्रीची दुर्दैवी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 10:59 AM2023-04-21T10:59:33+5:302023-04-21T11:24:58+5:30

'सूर्यवंशम' सिनेमात अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्रीच्या नशिबात हेच होतं.

अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लोकप्रिय सिनेमा 'सूर्यवंशम' सर्वांनाच माहित असेल. यामध्ये अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका होती. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर फारसा चालला नाही मात्र टीव्हीवर हा चित्रपट इतक्या वेळा दाखवला जातो की त्याचा एक रेकॉर्डच होईल.

सिनेमात त्यांच्या पत्नीचं काम करणारी अभिनेत्री सौंदर्या (Soundarya) आठवत असेलच. तिच्या अभिनयाने तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. बिग बींसमोर तिने ज्या आत्मविश्वासाने अभिनय केला हे पाहून लोक भारावले होते. मात्र इतक्या सुंदर अभिनेत्रीचा वयाच्या केवळ 31 व्या वर्षी विमान अपघातात मृत्यू झाला होता. 2004 साली तिचा मृ्त्यू झाला. या घटनेला आता २४ वर्ष झाली आहेत.

सौंदर्याचं खरं नाव होतं सौम्या सत्यनारायण. ती मूळची कन्नड अभिनेत्री होती. तसंच ती MBBS डॉक्टरही होती. 1999 मध्ये तिने सूर्यवंशम सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. आपल्या १२ वर्षांच्या करिअरमध्ये तिने १०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं.

सौंदर्या अशी अभिनेत्री होती जिने इतक्या कमी कालावधीतही तमिळ, तेलुगू, मल्याळम,कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये काम केलं. 2003 पर्यंत ती यशाच्या शिखरावर पोहोचली होती. असं असताना तिने लहानपणीचा मित्र जीएस रघु सोबत लग्न केले.

मात्र सौंदर्याच्या नशिबात खूपच कमी आयुष्य होतं. वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी तिच्यावर काळाने घाला घातला. 2004 साली एका राजकीय पदयात्रेत सहभागी होण्यासाठी सौंदर्या विमानाने निघाली होती. मात्र विमानाचं उड्डाण झाल्यानंतर काही क्षणात ते क्रॅश झालं. या दुर्घटनेत इतर लोकांसह सौंदर्या आणि तिच्या भावाचा मृत्यू झाला.

असं म्हणतात की सौंदर्याचा जन्म झाला तेव्हाच ज्योतिषीने तिचा कमी वयातच मृत्यू होईल असे सांगितले होते. यामुळे तिच्या आई वडिलांनी हवन केलं आणि इतरही उपाय केले. मात्र नशीबात जे होतं तेच झालं.

याहून दुर्दैव ते म्हणजे सौंदर्या त्यावेळी २ महिन्यांची गर्भवती होती आणि ती अभिनय सोडणार होती असा खुलासा तमिळ फिल्म दिग्दर्शक उदयकुमार यांनी केला होता. सौंदर्याने उदयकुमार यांना कॉल करुन सांगितले की चंद्रमुखीचा कन्नड रिमेक हा माझा शेवटचा सिनेमा असेल कारण मी गरोदर आहे. हे सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या मृत्यूची बातमी आली.

सौंदर्याने सूर्यवंशम, राजा, पवित्र बंधम, अरुणाचलम, अंत:पुरम अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले. कमल हसन, रजनीकांत या सुपरस्टार्स सोबतही तिने काम केले.