पोटाची भूक शमवण्यासाठी लसणाच्या पाकळ्या खाऊन 'हा' अभिनेता काढायचा दिवस, गाजवली मराठी चित्रपटसृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 15:03 IST2026-04-14T14:32:54+5:302026-04-14T15:03:49+5:30

लसणाच्या पाकळ्या खाऊन दिवस काढायचा 'हा' अभिनेता! पडद्यावर खलनायक गाजवणाऱ्या अभिनेत्याची डोळे पाणावणारी स्टोरी

मनोरंजनविश्वात असे अनेक अभिनेते होऊन गेले ज्यांनी केवळ हास्यअभिनेता म्हणूनच नाही तर खलनायक म्हणूनही रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाचे रंग भरले आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेते चंदु पारखी.

शरीरयष्टी बारीक असली तरी चेहर्‍याने खलनायकाचा भेसूरपणा उभा करणारे नाट्य चित्रपट अभिनेते चंदू पारखी यांचं आज पुण्यस्मरण.

अभिनेते चंदू पारखी यांचा जन्म १७ डिसेंबर १९४७ रोजी झाला. त्यांनी आपली अभिनयप्रतिभा पुरेपूर ओळखली होती. अभिनय तर करायचा, पण नेमकं काय करायचं, कसं करायचं, हा विचार करत असताना त्यांनी प्रयोग म्हणून आपल्या जवळच्या परिसरात आपली कला आजमावून पाहण्यास सुरुवात केली.

त्यासाठी त्यांनी छोटी नाटके, विनोदी एकपात्री, इतर कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. अभिनेता व्हायचं असेल तर इंदौरहून मायानगरी मुंबई गाठल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी जाणलं. एके दिवशी फक्त शे-दोनशे रुपये खिशात असताना, सरळ इंदूर ते मुंबई गाठली.

त्यांचा हा प्रवास फार काही सोपा नव्हता. मुंबईत राहून नाटकात काम मिळावं यासाठी ते नेहमी संघर्ष करत, कधी कधी तर उपाशी राहूनही दिवस काढावे लागत.

जेवणासाठी त्यांच्याकडे कधी कधी पैसे नसायचे. अशा वेळी पोटात जो आगडोंब उसळायचा तो शमवण्यासाठी त्यांनी स्वत:च एक शक्कल शोधून काढली. ते आपल्या झब्ब्याच्या खिशात दहा-बारा लसणाच्या पाकळ्या घेऊन फिरायचे. पोटात भुकेचा आगडोंब उसळला की खिशातल्या चार-पाच लसणाच्या पाकळ्या काढायचे, त्या खायचे आणि त्यावर ग्लासभर पाणी प्यायचे. त्यामुळे त्यांची भूक शमायची किंवा मारली तरी जायची. या उपायामुळे ते प्रचंड आजारी पडले.

‘निष्पाप’, ‘माझा खेळ मांडू दे’, ‘अशी ही फसवा फसवी’ या नाटकांसोबतच त्यांनी मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून कधी विनोदी, तर कधी खलनायकी भूमिका साकारल्या. आजही रसिकांच्या लक्षात राहणार्‍या 'लाईफ लाईन' या विजया मेहतान्नी दिग्दर्शित केलेल्या मालिकेतला वॉर्डबॉय, 'चाळ नावाची वाचाळ वस्ती'तील दारुच्या आहारी गेलेला नवरा आणि 'बोमकेश बक्षी' मधील 'रास्ते का कांटा' या जबरदस्त भूमिका चंदू पारखींनी वठवल्या.

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘जसा बाप तशी पोरं’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, सर्वश्रेष्ठ, ‘बाप रे बाप’, ‘कळत नकळत’, ‘बलिदान’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘राम रहीम’ यातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक देखील झाले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘दुसरे निळू फुले’ अशी एक ओळख त्यांना मिळाली होती. अभिनयाची अनोखी लकब आणि शैली या वैशिष्ट्यगुणांमुळे आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते. हा प्रवास यशस्वीपणे सुरु असतानाच १४ एप्रिल १९९७ रोजी या कलाकाराने अचानक या जगाच्या रंगमंचावरुन एक्झिट घेतली.