Satish Kaushik Death: आरोप बिनबुडाचे, माझ्या पतीला यात ओढू नका...सतीश कौशिक यांच्या पत्नीने अखेर मौन तोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 07:49 PM2023-03-12T19:49:39+5:302023-03-12T19:59:49+5:30

Satish Kaushik Death: अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर ड्रग्स आणि खुनाचा अँगल समोर आला आहे.

Satish Kaushik Death: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते सतीश कौशिक यांचे दिल्लीतील होळी पार्टीनंतर हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूला वेगळेच वळण लागले आहे. या प्रकरणात यापूर्वी सतीश कौशिक पार्टीसाटी गेलेल्या फार्म हाऊसमधून आक्षेपार्ह औषधे सापडल्याचे समोर आले होते.

यानंतर फार्म हाऊसचा मालक आणि सतीश कौशिकचा मित्र विकास मालूची पत्नी सान्वी मालू हिने सतीश यांची हत्या केल्याचा आरोप केला. यावर विकास मालूचेही स्पष्टीकरण समोर आले आहे. आता सतीश कौशिक यांच्या पत्नी शशी कौशिक यांनी यावर प्रतिक्रिया देत सान्वी मालूला खास आवाहन केले आहे.

सतीश कौशिक यांची पत्नी शशी कौशिक या प्रकरणी उघडपणे बोलल्या असून, सानवीने पती विकासवर केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. वृत्तवाहिनीशी केलेल्या संभाषणात त्यांनी व्यावसायिक आणि सतीश कौशिक यांचा मित्र विकास मालूचा बचाव केला.

सतीश आणि विकास खूप चांगले मित्र होते आणि कधीच भांडण करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. विकास हा खूप श्रीमंत असून तो पैशासाठी कोणाचीही हत्या करू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या. शशी यांच्या म्हणण्यानुसार, सतीश कौशिक होळी पार्टीसाठी दिल्लीला गेले होते, तिथे पैशाच्या व्यवहाराचा कोणताही मुद्दा नाही.

शशी कौशिक यांनी ड्रग अँगलचेही साफ खंडन केले आहे. त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टचा हवाला दिला आणि सांगितले की, सतीश यांच्या हृदयात 98% ब्लॉकेज होते आणि नमुन्यात कोणतेही औषध आढळले नाही. शशी म्हणाल्या, पोलिसांनी सर्व गोष्टींची पडताळणी केली आहे.

सान्वी कोणत्या आधारावर ड्रग्स आणि खुनाबद्दल बोलत आहे, हे मला समजत नाही. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती या सगळ्यात त्याचे नाव का ओढत आहे, ते मला कळत नाही. तिचा अजेंडा असू शकतो, कदाचित तिला तिच्या पतीकडून पैसे घ्यायचे आहेत आणि यात सतीशजींचे नाव आणत आहे, असे शशी म्हणाल्या.

सतीश कौशिक यांचे वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांचे खास मित्र अनुपम खेर यांना खूप वाईट वाटत असून, त्यांनी नुकतीच आपल्या मित्राच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी कोलकाता येथील काली घाटला भेट दिली. यादरम्यानचे फोटो समोर आले आहेत. याशिवाय अनेक बॉलीवूड कलाकारांनी दिलदार व्यक्तिमत्त्व सतीश कौशिक यांचे स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.