सूत्रसंचालिका ते फॅशन डिझायनर, प्रत्येक कामात तरबेज! 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' मधील नायिकेनं क्रिकेटचं मैदानही गाजवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 17:01 IST2026-04-15T16:51:50+5:302026-04-15T17:01:50+5:30

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' मध्ये झळकली! अभिनयानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरली, बनली पहिला क्रिडा होस्ट, ओळखलं?

छोट्या पडद्यावर सुरुवात केल्यानंतर रुपेरी पडद्यावर वाटचाल करत यशाचं शिखर गाठणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे मंदिरा बेदी.

सुप्रसिध्द अभिनेत्री, मॉडेल, फॅशन डिझायनर, फिटनेस आयकॉन आणि क्रिकेट होस्टींगमधील पहिली महिला होवून क्रांती घडविणारी अभिनेत्री म्हणून बंदिरा बेदी ओळखली जाते.

मंदिरा बेदीचा जन्म १५ एप्रिल १९७२ रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे वेरिंदर सिंग आणि गीता बेदी यांच्या घरात झाला. मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन शाळेतून शालेय शिक्षण आणि सेंट झेवियर महाविद्यालयातून पदवी मिळविल्यानंतर त्यांनी मुंबईतील सोफिया पॉलिटेक्निक कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

मंदिरा बेदी यांनी १९९४ मध्ये 'शांती' या दूरचित्रवाणी मालिकेतील मुख्य भूमिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. आईवर झालेल्या बलात्काराचे फलित असणारी मुलगी पुढे जावून महत्वाकांक्षी पत्रकार होते.दूरदर्शनवर प्रसारित होणारी भारतातील पहिली डेली सोप ऑपेरा म्हणून या मालिकेने इतिहास रचला.

१९९५ मध्ये 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या गाजलेल्या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं. त्याचबरोबर छोट्या पडद्यावरील कारकिर्द सुरु होती.

२००३ मध्ये, मंदिरा बेदी यांनी सोनी मॅक्सवर प्रसारित होणाऱ्या 'एक्स्ट्रा इनिंग्स' हा क्रिकेटवरील विश्लेषणात कार्यक्रम सुरू करून दूरचित्रवाणी आणि क्रिकेट उद्योगात खळबळ उडवून दिली.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तिच्या डिझायनर साड्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मंदिरा यांनी लवकरच क्रिकेटची भाषा शिकली. त्यांनी कधीही न खेळलेल्या खेळाशी विलक्षणपणे जुळवून घेतले. त्यानंतर अनेक वर्ष या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. यामुळे क्रीडा जगात एक नवीन दृष्टीकोन आणि ग्लॅमर आणण्यात ती यशस्वी ठरली.

वैयक्तिक जीवनात मंदिरा बेदी यांनी १९९९ मध्ये राज कौशल यांच्याशी विवाह केला होता. त्यांना दोन मुले असून, २०११ मध्ये जन्मलेला मुलगा आणि २०२० मध्ये दत्तक घेतलेली मुलगी आहे. २०२१ मध्ये राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.