बारावीत नापास झालेला 'हा' मराठमोळा अभिनेता, आज मराठी, साऊथसह बॉलिवूडही गाजवलंय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 18:59 IST2025-05-05T18:37:12+5:302025-05-05T18:59:34+5:30
आपली वेगळी वाट निवडत त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केलीयं.

आज सोमवारी महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा (12th Exam Result 2025) निकाल जाहीर करण्यात आलाय. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
या परीक्षेत अनेक जण पास झालेत. तर काही नापासही झालेत. यश-अपयशाच्या या क्षणी अनेकांना भविष्यात काय होईल याची चिंता सतावतेय. पण, परीक्षेतीलय यश हे सर्वस्व नसतं.
गुण म्हणजे गुणवत्ता नाही, आपल्याकडे वेगळी कला असेल, वेगळं काही करण्याची धमक असेल तर आपण आयुष्याच्या परीक्षेत नक्कीच टॉप करू शकतो.
असे अनेक कलाकार १२वी मध्ये अपयशी ठरले, पण त्यांनी हार न मानता वेगळी वाट निवडून यश संपादन केलं.
त्यापैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) हे आहेत.
मराठी, हिंदी, साऊथ इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ घालणारे अतुल कुलकर्णी हे बारावीत नापास झाले होते.
अतुल यांनी ही गोष्ट स्वतः एका मुलाखतीत सांगितली होती. ते म्हणाले होते की, "जर तेव्हा मी हुशार विद्यार्थी असतो आणि बारावीत उत्तम गुण मिळवून इंजिनिअरिंगला व्यवस्थित पास झालो असतो, तर कदाचित मी वेगळा माणूस झालो असतो. पण बारावीतल्या अपयशाचा काळ माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. खरा माणूस म्हणून मला याच काळानं घडवलं".
अतुल यांनी बारावीचं अपयश पचवून पुढे इंग्रजी साहित्यात बीए पूर्ण केलं. त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला प्रवेश घेतला होता.
अतुल आज एक लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी मराठी, साऊथसह बॉलिवूडही गाजवलं आहे. अत्यंत गुणी अभिनेते म्हणून ते ओळखले जातात.
बारावी नापास झालेला एक विद्यार्थी पुढे जाऊन राष्ट्रीय स्तरावरील अभिनेते होतो, यातून हेच दिसून येतं की आयुष्याची शर्यत फक्त गुणांनी नाही, तर जिद्दीनेही जिंकता येते!