भाजी विकून अभिनेत्याने फेडलं कोटींचं कर्ज; अमेरिकेतल्या बहिणींनी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडत दिली भावाला साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 14:02 IST2026-04-09T13:47:33+5:302026-04-09T14:02:53+5:30

एरवी भावा-बहिणींमध्ये प्रॉपर्टीवरुन वाद होतात हे आपल्याला माहितच आहे. पण अभिनेत्याला कर्ज फेडण्यासाठी बहिणींनी केलेली मदत हे उदाहरण वाचून सर्वांनी त्याचं कौतुक केलंय.

'साराभाई व्हर्सेस साराभाई' या लोकप्रिय मालिकेत 'रोशेश साराभाई'ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता राजेश कुमार सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

राजेशने नुकताच त्याच्या आयुष्यातील एका कठीण टप्प्याबद्दल खुलासा केला असून, त्याच्या बहिणींनी त्याच्यासाठी केलेल्या त्यागाची माहिती दिली आहे. जी वाचून तुम्हालाही राजेश आणि त्याच्या कुटुंबाचं कौतुक वाटेल.

राजेश कुमारने काही काळापूर्वी अभिनयापासून ब्रेक घेऊन आपल्या गावी जाऊन 'नैसर्गिक शेती' करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शेतीच्या या व्यवसायात त्याला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. या काळात त्याच्यावर तब्बल २ कोटी रुपयांचे कर्ज झाले होते.

राजेश यांच्या दोन बहिणी त्यावेळी फिनलँड आणि अमेरिकेच्या नागरीक होत्या. भावाला साथ देण्यासाठी या दोघींनीही गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला. बहिणींनीच प्रोत्साहन दिल्याने राजेशला पुन्हा अभिनयात सक्रीय होता आलं.

आज राजेशच्या बहिणी शेती सांभाळतात. त्यामुळे राजेशवर असलेला कर्जाचा डोंगर आता कमी झाला आहे. सध्या राजेशवर फक्त १० ते १५ टक्केच कर्ज बाकी आहे.

"माझ्या बहिणींनी माझ्यासाठी जे केले, ते मी कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी पुन्हा एकदा उभा राहू शकलो," अशा भावना राजेशने व्यक्त केल्या. राजेशच्या दोन्ही बहीणी आज भावाला साथ देत आहेत.

शेतीतील अनुभवानंतर राजेश कुमार आता पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय झाला आहे. अलीकडेच तो शाहीद कपूरच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'हड्डी' सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला.