नवा वाद! राज्यपालांच्या खुर्चीसोबत अभिनेत्रीचे फोटोसेशन; कोण आहे 'ही' मॉडेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 12:03 PM2022-12-08T12:03:51+5:302022-12-08T12:08:32+5:30

सध्याच्या राजकारणात महाराष्ट्राच्या चर्चेचं केंद्रबिंदू राजभवन आणि राज्यपाल यांच्या भोवती फिरताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. त्यात आता राज्यपालांचे राजभवन नव्या वादात सापडलं आहे.

नुकतेच महिला शिष्टमंडळाने राजभवनात एका कार्यक्रमानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीवेळी अभिनेत्री मायरा मिश्रा हीदेखील सहभागी होती. मात्र मायरानं राजभवनात केलेल्या कृत्यामुळे चांगलीच चर्चा निर्माण झाली आहे.

राजभवनात भेटीला गेलेल्या मायरा मिश्रानं राज्यपालांच्या खुर्चीसोबत काढलेले फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. मायरा मिश्रानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो व्हायरल केल्यानं यावरून तिला ट्रोल केले जात आहे.

त्याचसोबत मायरा मिश्रानं काढलेल्या फोटोवरून राजभवनातील अधिकारीही नाराज झाले आहेत. त्याबाबत अधिकाऱ्यांनी मायरा आणि महिलांच्या शिष्टमंडळाला समज दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका सामाजिक संस्थेच्या महिला शिष्टमंडळाने राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली.

या शिष्टमंडळासोबत टीव्ही अभिनेत्री मायरा मिश्रा होती. राजभवनात ज्या हॉलमध्ये ही भेट होणार होती. त्याठिकाणी राज्यपाल पोहचण्याअगोदर मायराने मोबाईल फोनमधून राज्यपालांच्या खुर्चीसोबत काही फोटो घेतले. हे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकले.

काही वेळाने मायरा मिश्राचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर राजभवनातील अधिकाऱ्यांनाही ही बातमी कळाली. तेव्हा राजभवनातील अधिकाऱ्यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी मायरा मिश्राला याबाबत समज दिल्याचं बोललं जात आहे.

राजभवनाच्या नियमानुसार, राज्यपालांच्या भेटीपूर्वी मोबाईल फोन बाहेर जमा करायला लागतो. परंतु मायरा मिश्राने या नियमाचे उल्लंघन केले. मायरा मिश्राने काढलेल्या या फोटोवरून मनसेने टीकास्त्र सोडलं. राज्यपालांच्या खुर्चीचा सन्मान आहे की नाही असा सवाल मनसेने विचारला आहे.

सोशल मीडियात हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आणि त्यावर वाद निर्माण होताच मायरा मिश्राने संबंधित फोटो सोशल मीडियावरून हटवला. मात्र या प्रकारामुळे महाराष्ट्रातील राजभवन आणि राज्यपाल पुन्हा माध्यमामंध्ये चर्चेत आले आहे.

मायरा मिश्रा ही एक टीव्ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. एमटीव्हीवरील 'स्प्लिट्व्हिला ११ व्या सीझनमध्ये तिने सहभाग घेतला होता. उत्तर प्रदेशात जन्मलेल्या मायराने कमी कालावधीत टीव्हीच्या छोट्या पडद्यावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

मायरा ही अशोका, उडान, बहू बेगम आणि भंवरसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करत होती. मालिकांसोबतच मायराने काही म्युझिक अल्बममध्ये काम केले आहे. रोना सिखड वे आणि सोनियो २.० च्या म्युझिक व्हिडिओतही मायरा दिसून आली आहे.