रहस्यमय प्रवास एका ‘जिद’चा
By Admin | Updated: November 25, 2014 22:51 IST2014-11-25T22:51:38+5:302014-11-25T22:51:38+5:30
रहस्यपट आणि थरारपट यांच्या सीमारेषेवरचा ‘जिद’ 28 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. ‘गुलाब गँग’फेम निर्माता अनुभव सिन्हा आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा हा चित्रपट.

रहस्यमय प्रवास एका ‘जिद’चा
पूजा सामंत - मुंबई
रहस्यपट आणि थरारपट यांच्या सीमारेषेवरचा ‘जिद’ 28 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. ‘गुलाब गँग’फेम निर्माता अनुभव सिन्हा आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा हा चित्रपट. मन्नारा हांडा आणि करणवीर शर्मा यात प्रमुख भूमिकेत आहे. या नवोदित जोडीने नुकतीच ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. यशस्वी होण्याची ‘जिद’ त्यांच्याशी गप्पा मारताना अनुभवास आली.
मन्नारा हांडा ऊर्फ बार्बी हांडा म्हणजे प्रियंका चोप्राची सख्खी मावस बहीण. त्यामुळे परिणिती चोप्रा, मीरा चोप्रानंतर आता प्रियंकाची आणखी एक बहीण ‘जिद’च्या निमित्ताने बॉलीवूडमध्ये आपलं नशीब अजमावण्यास सज्ज झाली आहे. हसतमुख स्वभावाच्या मन्नाराला तिच्या दीदीचं खूप कौतुक आहे. मध्यमवर्गीय मुलगी ते मिस इंडिया, नंतर मिस वर्ल्ड आणि आता बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री असा प्रियंकाचा प्रवास आम्हा सर्व भावंडांसाठी प्रेरणादायी आहे, असं ती सांगते. मात्र हा चित्रपट दीदीच्या शिफरशीमुळे मिळालेला नाही. माङयात काहीच गुण नसते तर कुठल्याही निर्मात्याने माङयावर करोडो रुपयांचा खेळ केला नसता, हे सुद्धा ती स्पष्ट करते.
मन्नाराचा स्ट्रगल
कारकिर्दीच्या आरंभी तिने साऊथचा सिनेमा केला. वडील वकील आहेत. लेकीने उच्चशिक्षण घ्यावं, अशी त्यांची इच्छा होती. मग तिने 12वी नंतर प्रॉडक्ट डिझायनिंग केलं. हौस म्हणून डान्स क्लासला जाऊ लागली. त्याच दरम्यान तिला योगायोगाने काही अॅड फिल्म्स मिळाल्या. अॅड फिल्म्स खूप केल्या, त्यामुळे आत्मविश्वास वाढला. एकदा तर डाबर हेअर ऑइलच्या जाहिरातीसाठी सेटवर आले तर दीदी तिथे भेटली. तूसी इत्थे? (तू इथे कशी?) असं तिने विचारल्यावर मी म्हटलं, मी मॉडेल आहे. ती खूप हसली. केवळ योगायोगाने आम्ही एकाच जाहिरातीत होतो. हीरो बाईक, नोकिया ल्युमिया अशा अनेक जाहिराती केल्या. त्यातूनच साऊथच्या सिनेमाची ऑफर आली आणि नंतर अनुभव सिन्हाने ‘जिद’ ऑफर केला, तिने आपला सगळा प्रवास उलगडून दाखवला.
मगरीच्या पिलाशी झुंज
एका सीनसाठी मन्नाराला मगरीच्या पिलाशी झुंज द्यायची होती. पिलू खरोखरीचं होतं. प्रत्येक वेळी कॅमेरा ऑन झाला की, ते फ्रेमबाहेर जायचं. असं तब्बल 25 वेळा झालं आणि मग शॉट ओके झाला. तोर्पयत मन्नाराचे दोन्ही पंजे मगरीने जखमी केले होते.
हिंदी सिनेमात अगदी चपखल बसेल, अशी उंचीपुरी देहयष्टी लाभलेला करणवीर शर्मा म्हणजे निर्माता कंवल शर्मा यांचा मुलगा. निर्मितीच्या क्षेत्रत असलेलं वडिलांचं नाव आपण कधीही न वापरल्याचं तो सांगतो. पहिला चित्रपट मिळवताना ओळख उपयोगी पडू शकते, पण त्यापुढे आपली प्रतिभा आणि क्षमताच आपल्याला साथ देते, यावर त्याचा ठाम विश्वास आहे.
चित्रपटांचं वेड
चित्रपटात करिअर करायचं, असं मी कधीही ठरवलं नव्हतं. प्रदर्शित झालेला प्रत्येक चित्रपट जुहूतल्या चंदन थिएटरमध्ये पाहायचो. हिंदी आणि इंग्रजी सिनेमांचा रतीबच लावला होता. त्यामुळे असेल कदाचित, पण मीही स्वत:ला पडद्यावर पाहू लागलो. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले, असं करणवीर सांगतो.
‘आठ साल पापड बेले’
त्याच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे त्याला म्युङिाक व्हिडीओज मिळाले. त्याने प्रॉडक्शन डिपार्टमेंटमध्येही काम केलं. एक परिपूर्ण अभिनेता बनण्यासाठी व्हॉइस मॉडय़ुलेशन, बॉडीलँग्वेज कोर्स केला. अनुपम खेरच्या अभिनय शाळेत अभिनयाचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्याला मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या. या दरम्यान त्याने अलेक पदमसींसोबत थिएटर केलं. ‘मुङो 8 साल पापड बेलने पडे आणि नंतर मला अनुभव सिन्हांनी त्यांच्या ‘जिद’साठी साइन केलं. बराच स्ट्रगल केला. शेवटी ठरवलं, काम करावं आणि विसरून जावं. ओझं बाळगत वाटचाल करू नये, असा करणवीरने भूतकाळ उलगडला.
क्राइम रिपोर्टर करणवीर
‘जिद’चं बरंचसं चित्रीकरण गोव्यात झालं आहे. करणवीरने त्यात क्राइम रिपोर्टरची भूमिका साकारली असून, मन्नाराने त्याच्या प्रेमात पडलेल्या ग्रामीण युवतीची व्यक्तिरेखा केली आहे. क्राइम रिपोर्टर रंगवण्यासाठी करणवीरने अनेक क्राइम रिपोर्टर्सच्या भेटी घेतल्या. त्यांचं काम,त्यांची देहबोली जाणून घेतली.