"त्याच्या रक्तामध्ये कावीळ मिसळली होती, आणि..."; रिल स्टार प्रथमेश कदमच्या निधनानंतर आईचा भावुक व्हिडिओ, अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 14:17 IST2026-02-11T14:14:42+5:302026-02-11T14:17:55+5:30
काही दिवसांपूर्वी रिल स्टार प्रथमेश कदमच्या निधनाने सर्वांना धक्का बसला होता. प्रथमेश कदमचं निधन नेमकं कशामुळे झालं, याबद्दल त्याच्या आईने अत्यंत भावुक व्हिडीओ शेअर केला आहे.

"त्याच्या रक्तामध्ये कावीळ मिसळली होती, आणि..."; रिल स्टार प्रथमेश कदमच्या निधनानंतर आईचा भावुक व्हिडिओ, अश्रू अनावर
काही दिवसांपूर्वी रिल स्टार प्रथमेश कदमच्या निधनाने सर्वांना धक्का बसला होता. प्रथमेश कदमचं निधन नेमकं कशामुळे झालं, याविषयी ठोस माहिती कोणालाच कळाली नाही. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले गेले. काही लोकांनी कमेंट करुन प्रथमेशने टोकाचं पाऊल उचललं, अशाही प्रतिक्रिया दिल्या. आता प्रथमेशच्या निधनानंतर त्याच्या आईने अत्यंत भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. प्रथमेशसोबत नेमकं काय घडलं? हे त्यांनी सांगितलं आहे.
प्रथमेशच्या रक्तात कावीळ पसरली, आणि...
प्रथमेशच्या आईने भावुक व्हिडीओ शेअर करताना सांगितलं की, ''नमस्कार मी प्रज्ञा प्रकाश कदम. प्रथमेशची मम्मी. काही दिवसांपासून मला खूप म्हणजे खूप त्रास होत होता. असे व्हिडीओ येत होते की, प्रथमेशने जीवन संपवलं, प्रथमेशला हे झालं,ते झालं. असं काहीही झालं नव्हतं त्याला. खरं कारण त्याचं एकच होतं की, त्याच्या ब्लडमध्ये रक्ताची कावीळ मिसळली होती. ती कावीळ म्हणजे सफेद कावीळ असते ती कोणालाही कळत नाही. डॉक्टरांनी मला खात्री दिली होती, जेव्हा मी त्याला अॅडमिट केलं. डॉक्टर बोलले दोन-तीन दिवसात तो कव्हर होईल. रिपोर्ट सर्व नॉर्मल होते. पण कावीळने घात केला माझ्या मुलाचा.''
''डॉक्टरांना पण नाही कळालं. शेवटच्या क्षणी डॉक्टरांना कळतंय की, त्याच्या रक्तामध्ये सफेद कावीळ झाली होती. डॉक्टर बोलले आपण बघूया. परंतु त्याच्या पूर्ण शरीरभर ती रक्ताची कावीळ मिसळली होती. तेव्हा डॉक्टर मला बोलले, आता तुम्ही देवाला प्रार्थना करा. तेव्हा मी खचून गेली. ती कावीळ पूर्ण रक्तामध्ये मिसळली की माणसाचं शेवटी मृत्यू होतो, आणि तेच झालं. २६ जानेवारीला सकाळी प्रथमेशने जगाचा निरोप घेतला.''
''मला खूप त्रास झाला. जेवढे त्याचे चाहते आहेत त्या सर्वांना खूप त्रास झाला. मी सर्वांना हात जोडून विनंती करते, कोणतीही खोटी अफवा पसरवू नका. कोणी काही बोलेल त्याच्यावर लक्ष देऊ नका. प्लीज आम्हाला, मला-माझ्या मुलीला मेसेज करुन विचारु नका, की काय आणि कसं झालं ते? तुमचा जो गैरसमज होता तो मी आता दूर केलाय. प्रथमेशचा फक्त रक्तातल्या कावीळमुळे निधन झालं. बाकी त्याला काहीही नव्हतं. त्यामुळे प्लीज कोणती अफवा पसरवू नका.''