"त्याने मला सेटवर...", 'गल्ली बॉय'च्या सेटवर रणवीर कसा वागायचा? अमृता सुभाषने खरं काय ते सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 17:26 IST2026-05-13T17:23:01+5:302026-05-13T17:26:24+5:30
"तो खऱ्या आयुष्यात…"'गल्ली बॉय'मध्ये रणवीर सिंहसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? अमृता सुभाष म्हणाली...

"त्याने मला सेटवर...", 'गल्ली बॉय'च्या सेटवर रणवीर कसा वागायचा? अमृता सुभाषने खरं काय ते सांगितलं
Amruta Subhash : गोड चेहरा, बोलका स्वभाव असलेली मराठी सिनेसृष्टीतील एक प्रतिभावंत अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष (Amruta Subhash).अमृता केवळ अष्टपैलू अभिनेत्रीच नाही तर ती लेखिका, गायिका, संगीतकार देखील आहे. पु.ल.देशपांडेच्या ती फुलराणी या नाटकामुळे ती सर्वप्रथम प्रसिध्दीच्या झोतात आली. तिने आजवर मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील महत्त्वपू्र्ण भूमिका वठवल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत 'गली बॉय', 'धमाका', 'रमन राघव', 'फिराक', 'कॉन्ट्रॅक्ट', 'निर्मला', 'चौसर' या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. यापैकी 'गली बॉय' या चित्रपटाने तिला संपूर्ण भारतभर प्रसिद्धी मिळवून दिली आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली.
गली बॉय या सिनेमात तिने अभिनेता रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली होती. अलिकडेच अमृताने भार्गवी चिरमुलेच्या 'गप्पा मस्ती'या पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली. यादरम्यान तिला रणवीर सिंहच्या एनर्जीविषयी कायम चर्चा होत असते, त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली,"तो खऱ्या आयुष्यात पूर्णपणे वेगळा आहे. कलाकारांना अनेकदा बाहेरच्या जगात तसं राहावं लागतं. तो चित्रपटाच्या सेटवर पूर्णपणे शांत असायचा. मी ज्या रणवीर सिंहला पाहिलं तो प्रत्यक्षात वेगळा आहे. तो भूमिकेचा पूर्ण अभ्यास करून सेटवर यायचा."
त्यानंतर अमृता सुभाष म्हणाली,"रणवीर आणि मी बऱ्याचदा सेटवर वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करत असायचो. त्याने मला विचारलं होतं, तुम्ही रमन राघव मधील भूमिकेसाठी कशी तयारी केली होती? तुमची भूमिकेपर्यंत पोहोचण्याची पद्धत कशी आहे? असे प्रश्न त्याने मला विचारले. मग पुढे आम्ही पद्मावत सिनेमाबद्दल चर्चा केली. अशा आमच्या चर्चा व्हायच्या."
रणवीरचं कौतुक करत म्हणाली...
पुढे ती म्हणाली,"या चित्रपटात माझ्या धाकट्या मुलाची भूमिका स्वर कांबळेने साकारली आहे. तो सेटवर नेहमीच रणवीरला म्हणायचा, मला मोठं होऊन रणवीरसारखं व्हायचं आहे. त्याच्यासोबत रणवीर खूप छान पद्धतीने डील करायचा. त्यासाठी काय करावं लागेल असे गो़ड प्रश्न स्वर त्याला विचारायचा, त्यावर 'तुला माझ्यासारखं व्हायचं असेल तर थिएटर वगैरे करावं लागेल', असे सल्ले तो त्याला द्यायचा. तो त्या मुलाला कायम प्रेरणा द्यायचा. त्याचा हा स्वभाव मला खूप आवडला."
अभिनेत्रीला रणवीरने दिलेला 'हा' सल्ला
"रणवीरकडून मला सेटवर एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे की तुमची एनर्जी तुम्ही योग्य ठिकाणी वापरली पाहिजे.तेव्हा रणवीर रात्री जाहिरातीचं शूट करून सकाळी गली बॉयच्या सेटवर हजर असायचा.एकदा सीन करून मी प्रचंड थकले. मी दमले... मी दमले असं मी सारखं म्हणत होते. तेव्हा रणवीर माझ्या जवळ आणि म्हणाला, 'तुम्ही थकलेल्या नाही आहात. हे सगळं तुमच्या डोक्यात आहे. तुम्ही सकारात्मक विचार करा, मग अजिबात थकणार नाही. ' त्याने सांगितलेली ती गोष्टी मी कधीही विसरू शकत नाही." असं अभिनेत्रीने सांगितलं.