धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 12:12 IST2025-10-27T12:11:12+5:302025-10-27T12:12:33+5:30
जळगाव जिल्ह्यातील मेहनती कलाकार म्हणून सचिनचं कौतुक व्हायचं. परंतु अभिनेत्याच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच चांगला धक्का बसला आहे

धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेता सचिन चांदवडेने (sachin chadwade) आत्महत्या केली आहे. सचिन हा २५ वर्षांचा होता. सचिनच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलं नाही. परंतु या घटनेमुळे मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असून सचिनच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सचिनचा आगामी सिनेमा 'असुरवन' हा लवकरच प्रदर्शित होणार होता. परंतु सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना सचिनने स्वतःचं जीवन संपवल्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
सचिन चांदवडे हा जळगाव जिल्ह्यातील उंदिरखेडे येथे राहणारा होता. अभिनयाची आवड असल्याने त्याने सिनेमात करिअर करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय त्याने सॉफ्टेवेअर इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं असल्याने तो पुण्यातील आयटी पार्कमध्ये नोकरी करायचा. नोकरीतून वेळ काढत सचिनने विविध कलाकृतींमध्ये अभिनय केला. त्याने नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित 'जमतारा २' वेबसीरिजमध्येही काम केलंय. याशिवाय कलावंत ढोल ताशा पथकात तो सक्रीय होता. जळगावमधील उभरता कलाकार म्हणून सचिनचं कौतुक व्हायचं. परंतु सचिनच्या आत्महत्येने सर्वांना चांगलाच धक्का बसलाय.
सचिन चांदवडेने 'विषय क्लोज' या सिनेमातही काम केलं होतं. नोकरी करता करता सचिन जशी संधी मिळेल तशी अभिनयाची आवड जपायचा. याशिवाय सणासुदीच्या काळात त्याने ढोल ताशा पथकात वादन करुन त्याची कला सादर केली आहे. तो सोशल मीडियावरही त्याच्या चाहत्यांच्या सातत्याने संपर्कात असायचा. सचिनने स्वतःचं आयुष्य संपवल्याने जळगाव जिल्ह्यातील एक मेहनती, हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याने चाहत्यांमध्ये हळहळ पसरली आहे.