'अशोक आणि माझ्यात नंतर दुरावा आला', महेश कोठारेंनी मान्य केली 'ती' चूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 13:47 IST2024-06-10T13:46:45+5:302024-06-10T13:47:16+5:30
काही चूका माझ्याकडून झाल्या. मी त्या मान्य करतो...

'अशोक आणि माझ्यात नंतर दुरावा आला', महेश कोठारेंनी मान्य केली 'ती' चूक
मराठी सिनेमाच्या इतिहासात सर्वात गाजलेलं त्रिकूट म्हणजे महेश कोठारे (Mahesh Kothare), लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ(Ashok Saraf) . लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनानंतर महेश- लक्ष्याची जोडी तुटली. पण तुम्हाला माहितीये का महेश कोठारेंच्या एका चुकीमुळे अशोक सराफ आणि त्यांच्यात दुरावा आला होता. 'धुमधडाका' च्या यशानंतर हा दुरावा निर्माण झाला होता.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत महेश कोठारे म्हणाले, "काही चूका माझ्याकडून झाल्या. मी त्या मान्य करतो यात शंकाच नाही. मला वाटत होतं 'धुमधडाका' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आपण नंतर जे प्रोजेक्ट्स करु त्यात महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे हे त्रिकूट पाहिजेच पाहिजे. असंच अपेक्षित होतं. पण नंतर ज्या स्क्रीप्टवर आम्ही काम करत होतो अण्णासाहेब देऊळगांवकर तेव्हा माझ्याबरोबर होते आम्ही एका स्क्रीनप्लेवर काम करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अशोक सराफची जी भूमिका आहे त्याला मी न्याय देऊ शकत नाहीये. "
ते पुढे म्हणाले, "आपण अशोकला नुसतंच घ्यायचं म्हणून बोलतोय पण असं म्हणून मला घ्यायचं नव्हतं. म्हणून मी त्या काळात त्याला टाळलं. हे मी त्याला जाऊनल कळवायला पाहिजे होतं. पण ते न कळवताच मी काम सुरु केलं आणि इथेच मी चुकलो."
'धुमधडाका' सिनेमा 1985 साली रिलीज झाला होता. अण्णासाहेब देऊळगांवकर यांनीच सिनेमाची पटकथा लिहिली होती. त्या काळी महेश कोठारे, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सिनेमा म्हणजे सुपरहिट असंच समीकरण बनलं होतं.