"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 10:33 IST2025-06-09T10:32:45+5:302025-06-09T10:33:50+5:30

मानसोपचार थेरपीवर मोकळेपणाने बोलली अमृता सुभाष

amruta subhash reveals she is getting psychological therapy since 10 years | "गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं

"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं

मराठी नाटक, मालिका, सिनेमा तसंच हिंदी सिनेमा, ओटीटी वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली गुणी अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash). अमृता गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजनविश्वात काम करत आहे. तिच्या प्रत्येक व्यक्तिरेखा या लक्षात राहणाऱ्या आहेत. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांमधून ती समोर येते. आता तिचा 'जारण' हा मराठी सिनेमा येत आहे. यानिमित्ताने तिने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. एका मुलाखतीत ती मानसोपचार थेरपीवर मोकळेपणाने बोलली आहे. 

'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अमृता सुभाष म्हणाली, "प्रत्येक कलाकार स्वत:च्या संवेदनशीलतेशी खेळत असतो. संवेदनशीलता हा गुण आहे तसाच तो कधीकधी शापही ठरतो. कशाअर्थी तर प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत खोलवर पोहोचते याचा कधीकधी त्रासही होतो. पण मी आता हे स्वीकारलं आहे. संवेदनशीलता नसेल तर मी एखादी व्यक्तिरेखा कशी समजून घेणार? त्यामुळे तो समतोल साधणं शिकायला हवं. यासाठी मला मानसोपचाराची खूप मदत झाली. मी १० पेक्षा जास्त वर्षांपासून थेरपी घेत आहे त्याचा मोठा हात आहे. माझ्या संवदेनांवर नियंत्रण ठेवणं मला त्यामुळे जमलं."

"माझ्या बाबांना अल्झायमरचं निदान झालं तेव्हा मला लक्षात आलं की मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवणं अवघड जात आहे. एकवेळ अशी होती की 'अवघाची संसार'चं शूट सुरु होतं आणि मला पहिलं वाक्यच काही केल्या आठवत नव्हतं. त्याआधी असं कधीच झालं नव्हतं. त्या दिवशी मला वाटलं की माझ्या भावना माझ्या कामाच्या आड येत आहेत. त्यावर नियंत्रण मिळवायलाच हवं. मग मला मानसोपचार तज्ञांकडे जायचा मार्ग ज्यांनी दाखवला ते आहेत विजय तेंडुलकर. त्यांना आपण लेखक म्हणून माहित आहेतच पण माणूस म्हणून त्यांनी मला दिशा दाखवली. मी मानसोपचारातून कुठून कुठे आली आहे हे मी सांगूही शकत नाही. मानसोपचारात तटस्थपणे बघण्याची ताकद आहे. ते मानसोपचार तज्ञ शिकलेले असतात त्यामुळे ते बरोबर आपल्याला मार्ग दाखवतात. "

थेरपी घेणं कमीपणा नाही

"शास्त्र म्हणून ते खूप प्रगत झालं आहे. कोणत्याही प्रकारच्या मानसिक आजारावर आज उपाय आहे. पण त्यासाठी तुम्हाला तिथे जावं लागेल. तिकडे जाण्यात कमीपणा नाही हे तुम्हाला स्वत:लाच सांगावं लागेल. मी स्वत: थेरपी गेल्यावर माझ्याच आसपासचे लोक मला 'हे तू काय करतेय' म्हणत हिणवत होते. मला त्या लोकांना हात जोडून विनंती करायची आहे की तसंही मनाचा त्रास होत असलेल्या माणसाला थेरपी घेणं अवघड असतं. त्यात तुम्ही अजून गिल्ट देऊ नका. त्याला पाठिंबा द्या. त्याला मदत करा." असंही ती म्हणाली.

अमृता बऱ्याच वर्षांनी मराठी सिनेमात परतली आहे. तिचा 'जारण' हा मराठी सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. काळ्या जादूवर हा सिनेमा आधारित असून अमृताचा अभिनयही थरकाप उडवणारा आहे.

Web Title: amruta subhash reveals she is getting psychological therapy since 10 years