'ए गरम बांगड्या, गरम बांगडया...', असा तयार झाला 'एलिझाबेथ एकादशी'मधील हा डायलॉगचा सीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:50 IST2025-02-08T16:50:19+5:302025-02-08T16:50:53+5:30
Elizabeth Ekadashi Movie : 'एलिझाबेथ एकादशी' या चित्रपटातील 'ए गरम बांगड्या, गरम बांगडया...' हा डायलॉग तुफान गाजला होता. हा डायलॉग म्हणणाऱ्या झेंडूने रसिकांच्या मनात घर केले.

'ए गरम बांगड्या, गरम बांगडया...', असा तयार झाला 'एलिझाबेथ एकादशी'मधील हा डायलॉगचा सीन
परेश मोकाशी दिग्दर्शित 'एलिझाबेथ एकादशी' चित्रपट (Elizabeth Ekadashi Movie) २०१४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. यातील बालकलाकारांनी रसिकांच्या मनात घर केले. श्रीरंग महाजनने ज्ञानेश तर सायली भांडाकवठेकर (Sayali Bhandarkavathekar) ने मुक्ता म्हणजेच झेंडूची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील 'ए गरम बांगड्या, गरम बांगडया...' हा डायलॉग तुफान गाजला होता. हा डायलॉग म्हणणाऱ्या झेंडूने रसिकांच्या मनात घर केले. या चित्रपटानंतर इंडस्ट्रीतून गायबच झालेली पाहायला मिळाली. आता झेंडू म्हणजेच सायली भांडाकवठेकर खूप मोठी झाली आहे. नुकतेच एका मुलाखतीत हा डायलॉग कसा शूट झाला, याबद्दल सांगितले.
सायली भांडाकवठेकर हिने नुकतेच कलाकृती मीडियाला मुलाखत दिली आहे. त्यात तिने एलिझाबेथ एकादशी चित्रपटाचे किस्से आणि बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत तिने या सिनेमातील 'ए गरम बांगड्या, गरम बांगडया...' या डायलॉगच्या शूटिंगचा किस्सा देखील सांगितला. सायली म्हणाली की, हा डायलॉग घडण्यामागे असा काही किस्सा नाही. कारण तो डायलॉग स्क्रीप्टेड डायलॉग होता. काही तरी घडले आणि मग तो डायलॉग लिहिला, असे काही नाही झाले. त्या सीनवेळी आजूबाजूचे ते वातावरण, मग त्या आजीने विचारणे, बांगड्या गरम कशा? हे सगळे जुळून आले. त्यामुळे हे लोकांना युनिक वाटले. बांगड्या कशा काय गरम असू शकतात. त्यात मी इतक्या आत्मविश्वासाने तो डायलॉग म्हणतेय.
परेश सर म्हणाले होते...
ती पुढे म्हणाली की, मला परेश सरांनी सांगितले होते, थोडे मिश्किलपणे डायलॉग घ्यायचा आहे, त्यामुळे थोडा आत्मविश्वास हवा. हे असेच असते, बांगड्या गरम असतातच. एवढा आत्मविश्वास आपल्यामध्ये हवा. एक हसऱ्या टोनमध्ये घ्यायचे. आपल्याला गिऱ्हाईकांचे तुमच्या दुकानाकडे लक्ष वेधून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे बांगड्या गरम म्हण. ते ऐकून दोन बायका आल्यादेखील, हे काय विकतेय विचारत.
चहावाला आणि झेंडूची केमिस्ट्री खूप छान वाटली
या सीनसाठी १० ते १२ रिटेक झाले असतील, असे सायलीने सांगितले आणि पुढे म्हणाली की, त्या दोन वाक्य शूट करण्यासाठी १० ते १२ रिटेक झाले होते. कारण ते परफेक्ट येणे तितकेच महत्त्वाचे होते. विशेष म्हणजे त्या चहावाल्यांबरोबर सगळे जुळवून आणणे. ते चहावाले रिटेकमुळे नंतर नंतर थकले होते. पण, त्यांनी ज्या पद्धतीने वाक्य घेतली ते पण खूप महत्त्वाचे होते. चहावाला आणि झेंडूची केमिस्ट्री खूप छान वाटली. तो सीन खूप जणांना आवडतो.