'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 15:33 IST2025-12-22T15:30:34+5:302025-12-22T15:33:45+5:30
मराठी मालिका आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. अनेकांनी याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे

'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मराठी सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक रणजित पाटील (Ranjit Patil) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने रणजित पाटील यांचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रणजित हे गेल्या काही वर्षांपासून मराठी मालिका, सिनेमा आणि नाटक विश्वात सक्रीय होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी एकांकिका स्पर्धांमधून तरुण कलाकारांनाही प्रोत्साहन दिलं.
रणजित पाटील यांच्या निधनामुळे मराठी नाटक आणि एकांकिका स्पर्धांमधील आधारस्तंभ हरपल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. अनेक तरुण रंगकर्मींना रणजित यांनी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केलं. त्यामुळेच रणजित यांच्या निधनाची बातमी सर्वांसाठी दुःखदायक आहे. सध्या रंगभूमीवर सुरु असलेल्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाचं दिग्दर्शन रणजीत यांनी केलं आहे.
रणजित यांनी झी मराठीवरील 'हृदयी प्रीत जागते' या मालिकेत अभिनय केला होता. रणजितने साकारलेल्या 'अंकल'च्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. रणजितने रुईया महाविद्यालयातील अनेक एकांकिकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती. रणजितच्या निधनामुळे मराठी कलाकार आणि अनेक रंगकर्मी हळहळ व्यक्त करत आहेत. युवा कलाकारांचा भक्कम आधारस्तंभ हरपल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.