'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 09:21 IST2026-05-08T09:20:59+5:302026-05-08T09:21:18+5:30
दिल्ली उच्च न्यायलयात सध्या 'धुरंधर २'मधील 'तिरछी टोपीवाले' गाण्यासंदर्भात कॉपीराईच केस सुरु आहे. यावेळी मेकर्सने 'धुरंधर २' च्या ओटीटी रिलीज डेटचा उल्लेख केला.

'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
जगभरात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आदित्य धरचा बहुचर्चित चित्रपट 'धुरंधर २' म्हणजेच 'धुरंधर: द रिव्हेंज' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला हा रिव्हेंज ड्रामा ज्यांनी अद्याप चित्रपटगृहात पाहिला नाही, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जरी निर्मात्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केली नसली, तरी दिल्ली उच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका सुनावणीदरम्यान या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
कोर्टातील सुनावणीत झाला तारखेचा खुलासा
'धुरंधर २' मधील क्लायमॅक्समध्ये 'त्रिदेव' चित्रपटातील प्रसिद्ध गाणे 'तिरछी टोपीवाले' परवानगीशिवाय वापरल्यामुळे सध्या दिल्ली उच्च न्यायालयात कॉपीराइट खटला सुरू आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान निर्मात्यांनी कोर्टाला सांगितले की, "हा चित्रपट मे महिन्याच्या मध्यापर्यंत ओटीटीवर येऊ शकतो. चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन या चित्रपटाला ७ आठवडे पूर्ण झाले असून अद्यापही याची कमाई सुरू आहे. विशेष म्हणजे, ५० दिवसांनंतरही हा चित्रपट जुनैद खानच्या 'एक दिन' पेक्षा जास्त कमाई करत आहे."
'तिरछी टोपीवाले' गाण्यावरून वाद
हा कायदेशीर वाद 'त्रिदेव' चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव राय यांनी दाखल केला आहे. त्यांच्या मते, मूळ गाण्याचे हक्क न घेता शाश्वत सचदेव यांनी ते रीमिक्स करून 'धुरंधर २' मध्ये वापरले. या वादावर न्यायालयाने दोन्ही पक्षांना आपापसात वाद मिटवण्यास सांगितले होते, मात्र त्यात यश आले नाही. सुपर कॅसेट्स आणि बी६२ फिल्म्स या निर्मात्यांनी कोर्टात स्पष्ट केले की, चित्रपट आधीच प्रदर्शित झाला असून आता तो १४ मे च्या आसपास ओटीटीवर येण्याची दाट शक्यता आहे.
बॉक्स ऑफिसवर 'दंगल'नंतर दुसरे स्थान
कमाईच्या बाबतीत 'धुरंधर २'ने भारतीय सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. ५० दिवसांत या चित्रपटाने भारतात १,३६५ कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले असून जगभरात या चित्रपटाने १,७९१.५५ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आमिर खानच्या 'दंगल'नंतर जगातील सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट 'जिओ हॉटस्टार' या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळत आहे.