७० वर्षांच्या आजीमुळे कान्समध्ये फाटलेला ड्रेस घालावा लागला; उर्वशी रौतेलाचा मोठा खुलासा, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:19 IST2025-05-21T15:19:14+5:302025-05-21T15:19:45+5:30
कान्समध्ये फाटलेला ड्रेस परिधान केल्याने उर्वशीला ट्रोल व्हावं लागलं. पण हा ड्रेस घालण्यामागचं खरं कारण तिने सोशल मीडियावर शेअर केलं आहे

७० वर्षांच्या आजीमुळे कान्समध्ये फाटलेला ड्रेस घालावा लागला; उर्वशी रौतेलाचा मोठा खुलासा, नेमकं काय घडलं?
अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (urvashi rautela) कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावून लोकांचं लक्ष वेधलं. उर्वशीने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्लॅमरस अंदाजात उपस्थिती दर्शवली. अशातच उर्वशी जेव्हा कान्समध्ये सहभागी झाली होती तेव्हा तिच्या फाटलेल्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधलं. अनेकांना उर्वशीने पब्लिसिटी स्टंट केला असं वाटलं. कान्ससारख्या जगप्रसिद्ध शोमध्ये फाटका ड्रेस का घातला, यामागचं कारण उर्वशीने सांगितलंय
म्हणून उर्वशीने घातला फाटलेला ड्रेस
उर्वशी रौतेलाने तिला कान्समध्ये फाटलेला ड्रेस का घालावा लागला, याविषयी खुलासा केलाय. उर्वशी म्हणाली की, "माझे प्रिय चाहते, मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करु इच्छिते. ज्यामुळे कान्स फेस्टिव्हलमधील रेड कार्पेटची व्याख्या बदलली. झालं असं की, आम्ही इव्हेंटला जात होतो तेव्हा अचानक आमची गाडी थांबली. ७० वर्षांची एक ज्येष्ठ व्यक्ती अचानक कारच्या समोर आली. त्यामुळे ड्रायव्हरने कार लगेच थांबवल्याने आम्हाला हादरा बसून आम्ही पुढच्या दिशेला आदळलो. या धक्क्यामुळे मी परिधान केलेला ड्रेस फाटला गेला. त्यावेळी मला ड्रेस फाटलाय म्हणून माझं काही नुकसान झालंय असं वाटलं नाही. त्याक्षणी मी जिवंत राहून नंतर रेड कार्पेटवर चालू शकले, यासाठी ऋणी आहे."
उर्वशी झाली ट्रोल
अशाप्रकारे उर्वशीने खुलासा केला. कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या लुक्समुळे चर्चेत आहे. मात्र फाटलेला ड्रेस परिधान केल्यामुळे यावेळी ती ट्रोलिंगच्या भोवऱ्यात सापडली आहे. याशिवाय कान्सच्या पहिल्या दिवशी उर्वशी रौतेला रंगीबेरंगी ड्रेसमध्ये पोहचली होती. तिच्या हातात पोपटाच्या डिझाईनची पर्स होती. या पर्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण आता उर्वशीने ड्रेसमागची भावना शेअर केल्याने अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.