धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच लोकांसमोर आला सनी देओल; 'बॉर्डर २' टीझर लाँचवेळी अभिनेत्याला अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 16:14 IST2025-12-16T16:12:02+5:302025-12-16T16:14:08+5:30
सनी देओलला 'बॉर्डर २'च्या टीझर लाँचवेळेस अश्रू अनावर झाले. सनीला उपस्थित लोकांनी धीर दिला. पाहा हा भावुक व्हिडीओ

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच लोकांसमोर आला सनी देओल; 'बॉर्डर २' टीझर लाँचवेळी अभिनेत्याला अश्रू अनावर
'बॉर्डर २' सिनेमाचा टीझर लाँच सोहळा आज मुंबईत पार पडला. या सोहळ्यात सिनेमातील सर्व स्टारकास्ट उपस्थित होते. सनी देओल 'बॉर्डर २'मध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. 'बॉर्डर' सिनेमातही सनी देओल झळकला होता. आता सिक्वलमध्येही सनी दिसणार आहे. मधल्या काळात सनीच्या वैयक्तिक आयुष्यात त्याला अनेक दुःखदायक घटनांचा सामना करावा लागला. त्यामुळे 'बॉर्डर २'च्या वेळेस सनी देओल भावुक झाला असताना सहकलाकारांनी आणि उपस्थित मीडियाने सनीला धीर दिला.
सनी देओलला अश्रू अनावर
सनी देओलने 'बॉर्डर २'च्या टीझर लाँचच्या वेळेस सिनेमातील खास लूक परिधान केला होता. जीपमधून सनी सेटवर आला होता. त्याच्यासोबत वरुण धवन, अहान शेट्टी हे दोघे कलाकारही त्यांच्या लूकमध्ये होते. टीझरचं अनावरण करायला सनी देओल स्टेजवर गेला होता. तेव्हा सनीच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्याला अश्रू अनावर झाले. त्याने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि शांत झाला.
#SunnyDeol EMOTIONAL | BORDER 2 💔🙏
— Rahul Gupta (@RahulGupta25376) December 16, 2025
Sunny Deol got emotional at the #Border2teaser launch, his first public appearance after Dharam ji’s passing. A truly touching moment. 💔🇮🇳 pic.twitter.com/c7jgB8VLPS
सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांचं काहीच दिवसांपूर्वी निधन झालं. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे देओल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे 'बॉर्डर २' निमित्ताने सनी देओल प्रथमच जाहीर इव्हेंटमध्ये दिसला. त्याच्यासाठी निश्चितच हा भावुक करणारा क्षण आहे. दरम्यान 'बॉर्डर २'चा टीझर आज लाँच झाला. या टीझरमधील सर्वात लक्ष वेधणारा सीन म्हणजे लष्कर अधिकारी असलेला सनी देओल त्याच्या इंडियन फौजला आवाहन करत विचारतो "आवाज कहाँ तक जाएगी?" आणि उत्तर येतं लाहौर तक".
'बॉर्डर २'च्या टीझरमझध्ये सनी देओलचा दमदार अवतार, दिलजीत दोसांझचा कटू आत्मविश्वास, अहान शेट्टीची निर्भिडता आणि धाडसी वरुण धवन पाहायला मिळत आहे. अनुराग सिंह यांनी 'बॉर्डर २'चं दिग्दर्शन केलं आहे. येत्या २३ जानेवारी २०२६ रोजी 'बॉर्डर २' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.