गोविंदासोबतच्या लग्नात सुनिताच्या वडिलांची गैरहजेरी; दोघांच्या नात्याला होता विरोध, काय होतं कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 12:59 IST2025-10-19T12:52:22+5:302025-10-19T12:59:40+5:30
सासऱ्यांनी गोविंदा आणि सुनिताच्या लग्नाला विरोध केला होता. इतकंच नव्हे तर लेकीच्या लग्नात सुनिताचे वडील आले नव्हते. काय होतं कारण?

गोविंदासोबतच्या लग्नात सुनिताच्या वडिलांची गैरहजेरी; दोघांच्या नात्याला होता विरोध, काय होतं कारण?
बॉलिवूडचा 'हिरो नंबर १' गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनिता आहूजा (Sunita Ahuja) यांच्याविषयी अनेक बातम्या समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी दोघं एकमेकांपासून घटस्फोट घेणार असल्याचं बोललं गेलं. परंतु त्या अफवा असल्याचं लक्षात आलं. अशातच दोघांविषयी आणखी एक बातमी समोर येत आहे. गोविंदा आणि सुनिताचं जेव्हा लग्न झालं तेव्हा, गोविंदाचे सासरे अर्थात सुनिताचे वडील यांचा या लग्नाला विरोध होता. काय होतं कारण?
सुनिताच्या वडिलांचा विरोध का होता?
गोविंदा आणि सुनिता आहूजा यांची पहिली भेट गोविंदाच्या मामाच्या घरी झाली होती. गोविंदाचे मामा आनंद सिंग यांनी या दोघांची भेट घडवून आणली. दोघांच्या भेटीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झाले, पण सुनिताचे वडील या नात्याच्या विरोधात होते. गोविंदा आणि सुनिताचे कुटुंबीय सिनेसृष्टीशी जोडलेले होते, परंतु सुनिताच्या वडिलांना गोविंदा हा योग्य मुलगा वाटत नव्हता. त्यांचं मत होतं की, गोविंदा हा एक स्ट्रगलिंग अभिनेता आहे आणि सुनिताने गोविंदाशी लग्न करू नये. त्यांनी सुनिताला हे नातं तोडण्यासाठी स्पष्टपणे सांगितलं होतं.
वडिलांच्या गैरहजेरीत झाला विवाह
वडिलांचा तीव्र विरोध असतानाही सुनिताने गोविंदासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९८७ साली अत्यंत साधेपणाने या दोघांचा विवाह पार पडला. वडिलांचा विरोध इतका होता की, त्यांनी मुलीच्या लग्नाला हजेरी लावली नाही. हा क्षण सुनितासाठी भावनिक होता. एका मुलाखतीत सुनीताने सांगितलं होतं की, त्या दिवशी तिला तिच्या वडिलांची खूप आठवण येत होती.
कालांतराने, गोविंदाने बॉलिवूडमध्ये मोठं यश मिळवलं. त्याने अनेक हिट चित्रपट दिले. गोविंदाच्या या यशानंतर सुनिताच्या वडिलांनी आपलं मत बदललं आणि ते या नात्यासाठी तयार झाले. गोविंदा आणि सुनिता आहूजा कायमच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सध्या दोघंही सांसारीक जीवनाचा आनंद घेत आहेत. त्यांना नर्मदा आणि यशवर्धन ही दोन मुलं आहेत.