Saif Ali Khan : सैफ अली खानच्या घरी याआधीही आला होता आरोपी; कशी केली होती हल्लेखोराने एन्ट्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:27 IST2025-01-21T10:27:01+5:302025-01-21T10:27:01+5:30
Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादने अटकेनंतर अनेक खुलासे केले आहेत. तो यापूर्वीही सैफच्या घरी गेला होता.

Saif Ali Khan : सैफ अली खानच्या घरी याआधीही आला होता आरोपी; कशी केली होती हल्लेखोराने एन्ट्री?
चित्रपट अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादने अटकेनंतर अनेक खुलासे केले आहेत. तो यापूर्वीही सैफच्या घरी गेला होता. त्यावेळी तो एका हाऊसकीपिंग कंपनीत काम करत होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो सैफ अली खानच्या घरी साफसफाईसाठी आला होता. १६ जानेवारीला सैफ अली खानच्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये दरोड्याच्या उद्देशाने तो घुसला.
सैफवर हल्लेखोराने चाकूने अनेक वार केले. यामध्ये सैफ जखमी झाला. त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी आरोपीने सुरक्षा रक्षक झोपलेला पाहिला आणि तो ११ व्या मजल्यावर गेला. ११ व्या मजल्यावर पोहोचल्यानंतर, तो डक्ट शाफ्ट वापरून सैफच्या फ्लॅटमध्ये शिरला. यानंतर तो मुलांच्या रुमशेजारील बाथरूममध्ये लपला.
तो आधी वरळीमध्ये राहत होता. घटनेच्या दिवशी त्याने ठाण्याला जाणारी ट्रेन पकडली. ठाण्यात त्याला घेण्यासाठी बाईकवरून एक माणूस आला. बाईकच्या नंबरप्लेटवरून पोलिसांनी १८ जानेवारी रोजी घोडबंदरपर्यंत त्याला ट्रॅक केलं. जिथे त्याला अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांचे डीसीपी दीक्षित गेडम यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद सैफच्या घरात दरोड्याच्या उद्देशाने घुसला होता. त्याला न्यायालयात हजर केलं जाईल. तो यापूर्वी सैफच्या घरी गेल्याचे कोणतेही पुरावे अद्याप आम्हाला सापडलेले नाहीत. त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही."
"आम्हाला संशय आहे की, तो बांगलादेशचा आहे. प्राथमिक पुराव्यांनुसार, आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं दिसून येतं. त्याच्याकडे भारतीय कागदपत्र नाहीत. त्याने स्वतःची ओळख विजय दास म्हणून दिली." पोलीस अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की, आरोपी ५-६ महिन्यांपूर्वीच मुंबईत आला होता आणि एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता.