सईबाईंच्या भूमिकेसाठी जिनिलियाचा सुरुवातीला नकार; रितेश देशमुखने सांगितला 'राजा शिवाजी'च्या सेटवरील भावुक प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 16:16 IST2026-04-28T16:15:30+5:302026-04-28T16:16:03+5:30
महाराणी सईबाईंच्या भूमिकेसाठी जिनिलियाने सुरुवातीला का दिला होता नकार? आणि शूटिंगदरम्यान रितेश देशमुख ढसाढसा का रडला? वाचा...

सईबाईंच्या भूमिकेसाठी जिनिलियाचा सुरुवातीला नकार; रितेश देशमुखने सांगितला 'राजा शिवाजी'च्या सेटवरील भावुक प्रसंग
Riteish Deshmukh Raja Shivaji movie : सध्या रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडली जाणार आहे. 'राजा शिवाजी' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका स्वतः रितेशनं साकारली आहे. तर जिनिलिया ही महाराणी सईबाईंच्या भूमिकेत आहे. मात्र, सुरुवातीला सईबाईंचं व्यक्तिमत्त्व पाहता जिनिलियाने नकार दिला होता. पण, जेव्हा जिनिलियानं भूमिका साकारली, तेव्हा तिचा अभिनय पाहून आपण शूटिंगदरम्यान ढसाढसा रडलो, असं रितेशनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
एका मुलाखतीत रितेशने सांगितले की, "जेव्हा मी जिनिलियाला सईबाईंची भूमिका नरेट केली, तेव्हा ती थेट 'नाही' म्हणाली होती. सईबाईंचं व्यक्तिमत्त्व खूप मोठं आहे, मी हे करू शकणार नाही असं जिनिलियानं म्हटलं. मात्र, आता ती भूमिका साकारल्यानंतर जिनिलिया म्हणते, "अशा महान व्यक्तिमत्त्वाला पडद्यावर जिवंत करण्याची संधी मिळणं हे तिच्यासाठी खूप मोठं सौभाग्य आहे".
शूटिंग दरम्यानचा असा कोणता सीन आहे, ज्यावेळी मन भरून आलं असेल, जो कायम लक्षात राहिलाय? या प्रश्नावर उत्तर देताना रितेश म्हणाला, "महाराज आणि राणी सईबाई यांचा एक अतिशय भावुक सीन आहे. खरं तर त्या सीनमध्ये मला रडायचं नव्हतं, फक्त डोळ्यात पाणी असणं अपेक्षित होतं. पण ज्या ताकदीने जिनिलियाने तो सीन केला, ते पाहून मी ढसाढसा रडायला लागलो. फक्त मीच नाहीतर तर सेटवर असलेल्या कॅमेरामॅनपासून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. ती जागा आणि तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. कधी कधी एखाद्या प्रसंगात अशी एक शुद्धता असते".
राम-सीतेसारखं पवित्र नातं
पुढे रितेश म्हणाला, "महाराज एक उत्तम पती, मुलगा, भाऊ आणि रयतेचे राजा होते. पण सईबाईंसोबतच्या त्यांच्या नात्यात एक वेगळीच पवित्रता होती. त्यांच्या नात्याकडे पाहताना भगवान राम आणि माता सीता यांच्या नात्याची आठवण येते, निर्मळ, नितळ आणि अत्यंत शुद्ध. जे आम्ही पडद्यावर तितक्याच आदराने साकारण्याचा प्रयत्न केला आहे. त्या दिवशी सेटवर जणू सगळेच त्या भावनेत वाहून गेले होते". दरम्यान, 'राजा शिवाजी' हा चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.