रणबीर कपूर पापाराझींवर भडकला, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:23 IST2026-05-06T13:10:45+5:302026-05-06T13:23:09+5:30
व्हिडिओमध्ये रणबीर कपूर पापाराझींवर संतापलेला दिसत आहे.

रणबीर कपूर पापाराझींवर भडकला, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ
बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर आज हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. कॅमेऱ्यासमोर 'रॉकस्टार' किंवा 'ॲनिमल' सारख्या आक्रमक भूमिका साकारणारा रणबीर एक अतिशय शांत, नम्र आणि अंतर्मुखी व्यक्ती म्हणून ओळखले जातो. पण, नुकताच त्याचा बेधडक अंदाज नेटकऱ्यांना पहायला मिळाला. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर हा पापाराझींवर संतापलेला दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी रणबीर याच्यासोबत त्याची पत्नी आलिया भट ही देखील दिसत आहे.
नीतू कपूर आणि कपिल शर्मा यांची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट 'दादी की शादी' येत्या शुक्रवारी (८ मे) प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगचा सोहळा नुकताच पार पडला. चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर रणबीर हा आलियासह बाहेर पडत होता. यावेळी त्यांचे फोटो काढण्यासाठी पापाराझींनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे आणि गोंधळामुळे रणबीर काहीसा अस्वस्थ झाला. तो रागात पापाराझींना म्हणाला की, तुम्हाला चांगले फोटो हवेत ना? त्यावर पापाराझी "हो" म्हणतात. त्यानंतर रणबीर "मागे व्हा" असे म्हणत पापाराझींना थोडे अंतर ठेवण्यास सांगतो. त्यानंतर रणबीर आलियासह तिथून निघून जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
रणबीरचे हे वागणे पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडलेत. अनेक चाहत्यांनी रणबीरची बाजू घेतली आहे. "पापाराझी अनेकदा सीमा ओलांडतात, रणबीरने त्यांना शिस्त लावून योग्यच केले" असे एकाने म्हटले. दुसऱ्या युजरने लिहिले की, "कॅमेरा आहे म्हणून तुम्ही कोणाच्याही खासगी जागेत शिरू शकत नाही". तर काही नेटकऱ्यांनी रणबीरवर टीकाही केली आहे. "फोटो काढण्यासाठी त्यांना बोलावले आणि आता त्यांच्यावरच संतापताय?" असा सवाल केला.
रिद्धिमा कपूरचे बॉलिवूड पदार्पण
'दादी की शादी' या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी वयाच्या ४५ व्या वर्षी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. रिद्धिमासाठी हा चित्रपट खूप खास आहे, कारण यात ती पहिल्यांदा आपली मुलगी समारासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन आशिष आर. मोहन यांनी केले आहे. रिद्धिमा कपूर साहनी, नीतू कपूर आणि कपिल शर्मा यांच्याबरोबरच या चित्रपटात आर. सारथ कुमार, सादिया खतीब, योगराज सिंह यांसारखे अनेक कलाकार विविध भूमिकांत दिसणार आहेत.