"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 11:11 IST2025-10-25T10:57:27+5:302025-10-25T11:11:01+5:30
'रामायण' सिनेमात लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने त्याची भावना व्यक्त केलीय. याशिवाय सेटवर वातावरण कसं असायच, हे सांगितलंय

"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' (Ramayana) चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका साकारणारा अभिनेता रवी दुबे (Ravie Dubey) याने सेटवरील अनुभव आणि मुख्य कलाकार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) भूमिकेसाठी किती मेहनत घेतोय, याविषयी खुलासा केलाय. रवी दुबेने या चित्रपटाच्या शूटिंगला एका 'महायज्ञा'सारखं म्हटलं आहे. जाणून घ्या
'रामायणा'चा सेट म्हणजे...
रणवीर अल्लाहबादियासोबतच्या पॉडकास्टमध्ये बोलताना रवी दुबेने 'रामायण' चित्रपटाच्या सेटवरील वातावरणाबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, ''अनेक चित्रपटांच्या सेटवर खूप गोंधळाचं वातावरण असतं, पण 'रामायण' सिनेमाचं शूटिंग घड्याळ्याच्या काट्यानुसार शिस्तबद्ध पद्धतीने असायचं. एकही शिफ्ट वाढवली गेली नाही आणि प्रत्येकजण वेळेवर तयार असायचा.''
रवी म्हणाला, "ती भूमिका (लक्ष्मण) मिळाल्यानंतर माझ्यात खूप बदल झाला. प्रेक्षकांना खोटं काम लगेच कळतं, त्यामुळे या भूमिकेला न्याय देण्यासाठी मला स्वतःला पूर्णपणे बदलावं लागलं. मी माझी संपूर्ण दिनचर्या बदलली. खरं तर, रणबीर कपूरसह आम्हा सर्वांनीच हे बदल केले आहेत. रणबीरने या चित्रपटासाठी खूप त्याग केला आहे. हा संपूर्ण अनुभव एका 'यज्ञा'सारखा वाटत होता. आम्ही सर्वांनीच या पात्रांशी प्रामाणिक राहण्यासाठी आमच्या स्वभावात, हावभावांमध्ये आणि बोलण्यातही बदल करण्यासाठी शक्य ते सर्व केलं."
रणबीर कपूर आणि यशमध्ये फरक
या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत आहे, तर 'KGF' फेम यश रावणाची भूमिका करत आहे. या दोन्ही मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याच्या अनुभवावर रवी दुबेने भाष्य केलं. रवी म्हणाला, "रणबीरचं वलय अविश्वसनीय आहे. तो शांत, विनम्र आणि अत्यंत समर्पित आहे. त्याच्यात एनर्जी असली तरीही तो खूप सौम्य आहे, जे त्याला भेटणाऱ्या प्रत्येकाला जाणवतं. याउलट यश हा खूप मनमिळाऊ, उत्साही आणि खरा व्यक्ती आहे. दोघेही खूप वेगळे आहेत, पण तितकेच विनम्र आणि प्रेमळ आहेत."
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' सिनेमामध्ये प्रमुख कलाकारांसोबतच साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.