प्रियांका चोप्रा बनवणार नेपाळी-सिक्कमी भाषेतील चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 17:56 IST2017-01-07T17:56:06+5:302017-01-07T17:56:06+5:30

हॉलीवूड आणि बॉलीवूड पादक्रांत केलेली आपली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा अभिनय, मॉडेलिंग आणि गायक म्हणून कौशल्य सिद्ध केल्यानंतर निर्मितीच्या ...

Priyanka Chopra will make Nepali-Sikkim language films | प्रियांका चोप्रा बनवणार नेपाळी-सिक्कमी भाषेतील चित्रपट

प्रियांका चोप्रा बनवणार नेपाळी-सिक्कमी भाषेतील चित्रपट

लीवूड आणि बॉलीवूड पादक्रांत केलेली आपली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा अभिनय, मॉडेलिंग आणि गायक म्हणून कौशल्य सिद्ध केल्यानंतर निर्मितीच्या क्षेत्रातही नवीन पायंडा घालताना दिसत आहे. निर्माता म्हणून तिने तद्दन गल्लेभरू हिंदी सिनेमे तयार करण्यापेक्षा प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट तयार करण्यावर भर दिलेला आहे.

आता तर ती एक पाऊल आणखी पुढे जात आहे. लवकरच ती नेपाळी-सिक्कमी भाषेतील चित्रपट प्रोड्यूस करणार असून त्याचे नाव ‘पौआ’ असे आहे. या शब्दाचा अर्थ होतो पाहुणे. सामाजिक-राजकीय संकटामुळे मुलांपासून वेगळे झालेल्या पालकांची गोष्ट यामध्ये दाखवण्यात येणार आहे. तिची आई मधू चोप्राने नुकतीच याबाबत अधिकृत घोषणा केली.

मागच्या तीन वर्षांपासून या चित्रपटाची कल्पना प्रियांकाच्या डोक्यात घोळत होती. उत्तर-पूर्व भारतात मेरी कोमच्या जीवनावर आधारित चित्रपटाची शूटींग करताना तिला या भागातील कथेवर चित्रपट काढण्याची इच्छा निर्माण झाली होती. मागच्या वर्षी आसाम राज्याची तिची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणूनही अधिकृत नियुक्ती करण्यात आली. २६ डिसेंबर रोजी गुवाहटी येथे पार पडेलेल्या एका पर्यटन कार्यक्रमालासुद्धा ती हजर होती.

प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी ती आता इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट बनवणार असल्याचे सांगण्यात येतेय. या नेपाळी-सिक्कमी चित्रपटानंतर ती छत्तीसगड आणि राजस्थान येथील प्रादेशिक भाषांतून चित्रपट निर्मिती करणार आहे. आतापर्यंत तिने मराठी (व्हेंटिलेटर) आणि भोजपूरी (बम बम बोल रहा है काशी) या दोन भाषेत चित्रपट प्रोड्यूस केलेले आहेत. लवकरच तिच्या प्रोडक्शन कं पनीचा पंजाबी चित्रपट ‘सरवन’ प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रसिद्ध पंजाबी अभिनेता-गायक अम्रिंदर गिल प्रमुख भूमिकेत आहे.

तिच्या करिअरविषयी सांगायचे तर तिने ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या पर्वाची शूटींग पूर्ण केली असून मे महिन्यात तिचा हॉलीवूड डेब्यू चित्रपट ‘बेवॉच’ रिलीज होत आहे. यामध्ये ती खलनायिका असून ड्वेन जॉन्सन (द रॉक) आणि झॅक अफ्रॉन तिचे सहकलाकार आहेत. तिचा शेवटचा हिंदी सिनेमा ‘जय गंगाजल’ होता. त्यानंतर ती कोणता हिंदी चित्रपटा स्वीकारते याबाबत उत्सुकता आहे. संजय लीला भंसाळींनी तिला शाहरुखसोबतच्या चित्रपटाची आॅफर दिल्याची वार्ता होती. परंतु तिने स्वत: याचे खंडन केले. तूर्तास मी कोणताच चित्रपट साईन केला नसून केवळ पटकथा वाचत असल्याचे तिने सांगितले.

Web Title: Priyanka Chopra will make Nepali-Sikkim language films