दिलदार! गावातील शाळेसाठी पंकज त्रिपाठी गेले धावून, म्हणाले, "मुलांचा विकास..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 17:08 IST2023-05-26T17:06:59+5:302023-05-26T17:08:48+5:30
पंकज त्रिपाठी बिहारच्या छोट्या गावातून आले आणि आता बॉलिवूड गाजवत आहेत.

दिलदार! गावातील शाळेसाठी पंकज त्रिपाठी गेले धावून, म्हणाले, "मुलांचा विकास..."
अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) बॉलिवूडमधील अतिशय प्रतिभावान अभिनेते. कोणतीही भूमिका असो पंकज त्रिपाठी आपली छाप पाडतातच. केवळ इशाऱ्याने देखील ते उत्तम अभिनय करतात. पंकज त्रिपाठी बिहारच्या छोट्या गावातून आले आणि आता बॉलिवूड गाजवत आहेत. पण अजूनही त्यांची गावाशी नाळ जोडलेली आहे. ते आजही आपल्या गावाच्या विकासासाठी झटत आहेत.
पंकज त्रिपाठी यांच्यासाठी त्यांची शाळा खूप जवळची आहे. ते म्हणतात, "मुलांच्या विकासात शिक्षण महत्वाचं आहे. माझ्या शाळेचे मुख्याध्यापक जेव्हा मला म्हणाले की शाळेची बाउंड्री वॉल आणि गेट बांधण्यासाठी पैशांची गरज आहे कारण मुलं खेळताना बाहेर जातात त्यामुळे अपघाताचा धोका आहे. त्यांच्या मदतीस धावून जाणं हे माझं कर्तव्य आहे असं मला वाटलं. मी त्याच शाळेत शिकलो होतो. भावाच्या मदतीने एक प्रकल्प तयार केला आणि पैशाची व्यवस्था करून शाळेचे नूतनीकरण केले.
ते पुढे म्हणाले,"मी गावातील शाळेला भेट दिली तेव्हा तिची अवस्था अतिशय वाईट होती. प्लॅस्टर पडत होते, रंग उतरला होता, पंखेही नीट काम करत नव्हते, दिव्यांची योग्य व्यवस्था नव्हती. अशा परिस्थितीत शाळा आणि मुलांच्या विकासासाठी या दिशेने काम करणे गरजेचे आहे."
पंकज त्रिपाठी यांच्या कामाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. ते लवकरच मिर्झापूरचा तिसऱ्या भागात दिसणार आहेत. मिर्झापूर वेबसिरीजमधील त्यांची कालीन भैय्या ही भूमिका खूपच गाजली आहे.